Headlines

कृती समिती आक्रमक:150 कोटी लाटले, रस्ता मात्र खड्ड्यात! नगर-मनमाड हायवेच्या कामावरून राडा




सावळीविहीर ते अहिल्यानगर बायपास या नगर-मनमाड महामार्ग (एमएच १६०) कामात मोठा बोजवारा उडाला आहे. निकृष्ट दर्जाचे काम झाले असतानाही संबंधित ठेकेदाराला तब्बल १५० कोटी रुपयांचे पेमेंट अदा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. गुणवत्ता नियंत्रण कंपनी ‘लायन’ आणि ठेकेदार ‘भारत कन्स्ट्रक्शन’ यांच्या संगनमतामुळेच हा गैरप्रकार झाल्याचा आरोप होत आहे. दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनीही कामात त्रुटी असल्याचे मान्य करत ठेकेदाराला नोटीस बजावल्याची कबुली दिली आहे. या महामार्गावरील त्रुटी आणि तक्रारींबाबत राहुरी नगरपालिकेच्या सभागृहात एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. माजी राज्यमंत्री तथा आमदार प्राजक्त तनपुरे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. आमदार तनपुरे यांनी महामार्ग प्राधिकरणाच्या कारभारावर संताप व्यक्त केला. हायवेकडे ३० मीटर रुंदीचा रस्ता उपलब्ध असताना, प्रत्यक्षात मात्र केवळ १९ मीटर रुंदीचा रस्ता आणि ३ मीटरच्या साईड गटारी विकसित केल्या जात आहेत. या नियोजनामुळे शहरात अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. या साईड गटारींच्या चुकीच्या डिझाईनमुळे पावसाचे पाणी पश्चिमेकडील भागात मोठ्या प्रमाणावर साचणार असून नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागणार आहे. याबाबत आपण राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून डिझाईन बदलण्यास लावू, असे तनपुरे यांनी स्पष्ट केले. अधिकाऱ्यांची केली कानउघाडणी निकृष्ट दर्जाच्या कामावरून आमदार तनपुरे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतरही अंतिम थर (फायनल लेअर) त्वरित का टाकण्यात आला नाही? याची जबाबदारी कोणाची?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.यावर सारवासारव करत महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी सूरज कदम यांनी, “संबंधित ठेकेदाराला वेळेत डांबर मिळू शकले नाही, त्यामुळे हा अंतिम थर टाकण्यास उशीर झाला, असे समर्थन मांडले. युवा नेते हर्ष तनपुरे यांनी राहुरी बाजार समितीच्या वाहतुकीचा मुद्दा उपस्थित केला. बाजार समिती आवारात रोज ३० ते ४० टनांच्या जवळपास दीडशे ते दोनशे गाड्यांची मोठी ये-जा सुरू असते. अशा गजबजलेल्या भागात साईड गटारी केल्यास वाहतुकीचा मोठा खोळंबा होईल, त्यामुळे या ठिकाणच्या साईड गटारी रद्द कराव्यात, अशी आक्रमक मागणी त्यांनी केली. अधिकारी निरुत्तर; अनेक प्रश्न हवेतच बैठकीत रस्ता दुरुस्त कृती समितीचे अध्यक्ष देवेंद्र लांबे, सतीश घुले, नवनीत दरक, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, नगरसेवक सोन्याबापू जगधने, प्रतीक तनपुरे, मोरे, प्रितेश तनपुरे, अविनाश गाडे, निलेश शिरसाठ आदींनी चर्चेत भाग घेत अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नागरिक आणि लोकप्रतिनिधींनी विचारलेल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे नव्हती. अधिकारी केवळ थातूरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न करत होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *