Headlines

हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो सुरक्षा तपासणी पूर्ण, तरीही सुरू नाही:माजी आमदार मोहन जोशींचा सवाल; मुख्यमंत्र्यांच्या घोषणा पोकळ ठरल्या




हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो प्रकल्पाची सुरक्षा तपासणी पूर्ण होऊन आवश्यक प्रक्रिया पार पडली असतानाही अद्याप प्रवाशांसाठी सेवा सुरू करण्यात आलेली नाही. यावरून माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी राज्य सरकार आणि महामेट्रोवर जोरदार टीका केली आहे. सुरक्षा मंजुरी मिळाल्यानंतरही मेट्रो सुरू करण्यास विलंब का होत आहे, ती नेमकी कोणासाठी रोखून ठेवली आहे, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मोहन जोशी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वीच्या घोषणांची आठवण करून दिली. पुणे दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा मे महिन्यात आणि दुसरा टप्पा जुलै महिन्यात सुरू होईल, अशी घोषणा केली होती. मात्र, या दोन्ही घोषणांची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली नाही. विशेषतः १५ जुलैपर्यंत तरी पहिला टप्पा सुरू होईल, अशी प्रवासी आणि आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, तीही फोल ठरल्याचा आरोप त्यांनी केला. जोशी यांनी भाजप सरकारवर श्रेयवादाचे राजकारण केल्याचाही आरोप केला. यापूर्वी पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन व्हावे, यासाठी कार्यान्वित करण्यात विलंब करण्यात आल्याचा दावा करत त्यांनी हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोबाबतही तसाच प्रकार सुरू आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. मेट्रो सेवा सुरू करण्याऐवजी उद्घाटनाचा मुहूर्त आणि राजकीय श्रेय यालाच अधिक महत्त्व दिले जात असल्याची टीका त्यांनी केली. हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोचे मूळ वेळापत्रक मार्च २०२५ पर्यंत प्रकल्प सुरू करण्याचे होते. मात्र त्यानंतर सप्टेंबर २०२५, डिसेंबर २०२५, मार्च २०२६, मे २०२६, १५ जून २०२६ आणि १५ जुलै २०२६ अशा अनेक तारखा जाहीर करण्यात आल्या. प्रत्येक वेळी उद्घाटनाच्या घोषणा झाल्या, मात्र प्रत्यक्षात मेट्रो सेवा सुरू झाली नाही. त्यामुळे वारंवार दिल्या जाणाऱ्या मुदतवाढीमुळे नागरिकांचा विश्वास उडत असल्याचे जोशी यांनी म्हटले. हिंजवडी आयटी पार्क हा देशातील महत्त्वाच्या आयटी केंद्रांपैकी एक असून दररोज लाखो कर्मचारी या मार्गावरून प्रवास करतात. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी मेट्रो हा प्रभावी पर्याय मानला जात असतानाही प्रकल्प सुरू करण्यात होत असलेला विलंब नागरिकांच्या सहनशीलतेची परीक्षा घेत असल्याचे जोशी यांनी नमूद केले. भाजप सरकारने विकासाच्या नावाखाली केवळ घोषणा केल्या, मात्र प्रत्यक्षात प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात अपयश आले, असा आरोप करत त्यांनी हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो तातडीने सुरू करून पुणेकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली. सुरक्षा तपासणी पूर्ण झाल्यानंतरही सेवा सुरू होत नसल्याने या विलंबामागील नेमके कारण सरकारने स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *