![]()
मोशी येथील कचरा डेपोवर झालेल्या भीषण दुर्घटनेप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने मोठी प्रशासकीय कारवाई केली आहे. दुर्घटनेत नऊ कंत्राटी कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर जबाबदारी निश्चित करण्याच्या दिशेने पाऊल उचलत महापालिकेचे मुख्य अभियंता-१ संजय नारायण कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता (पर्यावरण) योगेश सोपान आल्हाट यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे. याशिवाय महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ अंतर्गत दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी बुधवारी दिले आहेत. ८ जुलै २०२६ रोजी मोशी कचरा डेपोवरील कचऱ्याचा प्रचंड ढिगारा अचानक कोसळून शेजारील आरसीसी इमारतीवर पडला होता. या भीषण दुर्घटनेत डेपोवर काम करणाऱ्या नऊ कंत्राटी कामगारांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते. दुर्घटनेनंतर प्रशासनाने तातडीने चौकशी सुरू करत संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी आणि कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांनी सादर केलेले खुलासे समाधानकारक नसल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यांच्या स्पष्टीकरणात वस्तुस्थितीचा अभाव असून जबाबदारी टाळण्याचा प्रयत्न झाल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आल्याने पुढील कठोर कारवाई करण्यात आली. मुख्य अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर मोशी कचरा डेपोच्या कामकाजावर प्रभावी नियंत्रण आणि पर्यवेक्षण न ठेवल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तसेच सुरक्षाविषयक उपाययोजनांकडे दुर्लक्ष, आवश्यक खबरदारी न घेणे आणि कर्तव्यात अक्षम्य हलगर्जीपणा केल्याचा आरोपही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दुसरीकडे, कार्यकारी अभियंता योगेश आल्हाट यांच्यावर पर्यावरणीय नियमांचे पालन करण्यात त्रुटी राहिल्या, आवश्यक देखरेख करण्यात निष्काळजीपणा झाला आणि कामकाजातील गंभीर त्रुटी प्रथमदर्शनी आढळल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. महापालिका आयुक्तांनी दोन्ही अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशीचे आदेश देताना संबंधित विभागाला १५ दिवसांच्या आत दोषारोपपत्र सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चौकशी पूर्ण होईपर्यंत दोन्ही अधिकारी निलंबित राहतील. निलंबनाच्या कालावधीत त्यांना शासकीय नियमानुसार निर्वाह भत्ता दिला जाईल. तसेच या कालावधीत त्यांना कोणताही अन्य व्यवसाय किंवा नोकरी करता येणार नसल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. मोशी कचरा डेपो दुर्घटनेनंतर जबाबदारी निश्चित करण्यासाठी प्रशासनाने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. विभागीय चौकशीच्या अहवालानंतर संबंधित अधिकाऱ्यांवर आणखी कठोर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, दुर्घटनेमागील नेमकी कारणे, सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटी आणि प्रशासनाची जबाबदारी याबाबतची चौकशीही सुरू असून, त्यातून आणखी महत्त्वाचे निष्कर्ष समोर येण्याची शक्यता आहे.
Source link
मोशी दुर्घटना: मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता निलंबित:महापालिका आयुक्तांनी दिले विभागीय चौकशीचे आदेश