![]()
गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील १८ आदिवासी विद्यार्थ्यांनी नुकतीच नागपूर येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेला (आयआयएम) भेट दिली. ‘जागृत’ या सामाजिक संस्थेने हा विशेष शैक्षणिक अभ्यासदौरा आयोजित केला होता, ज्यात १२ विद्यार्थी आणि ६ विद्यार्थिनींचा समावेश होता. नक्षलवादी हिंसाचाराच्या छायेत बालपण घालवलेल्या या विद्यार्थ्यांनी आता जागतिक शिक्षणाचे स्वप्न पाहिले आहे. एकेकाळी नक्षलवादाच्या प्रभावाखाली असलेल्या या दुर्गम भागांमध्ये आता सुरक्षा दलांच्या प्रभावी कारवाईमुळे परिस्थिती बदलली आहे. भीतीची जागा आता नव्या पिढीच्या डोळ्यांतील शिक्षणाच्या आणि स्वावलंबनाच्या विश्वासाने घेतली आहे. आयआयएमचा भव्य परिसर, आधुनिक इमारती आणि अथांग ग्रंथालय पाहून हे विद्यार्थी भारावून गेले. या भेटीदरम्यान आयआयएमचे संचालक डॉ. भीमराया मैत्री यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी स्वतःच्या सातारा जिल्ह्यातील दुर्गम भागातून आलेल्या संघर्षमयी प्रवासाची कथा सांगितली. प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन देशाच्या सर्वोच्च पदापर्यंत कसे पोहोचले, हे सांगून त्यांनी विद्यार्थ्यांमधील न्यूनगंड दूर केला. कठोर परिश्रमाला पर्याय नाही आणि मेहनतीला यशाची जोड मिळाल्यास त्याचे ‘स्मार्ट वर्कमध्ये’ रूपांतर होते, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. प्रा. शैलेंद्र निगम यांनी संस्थेच्या शिष्यवृत्ती आणि विविध शैक्षणिक योजनांची माहिती दिली. गुणवत्तेच्या जोरावर पैशाची चिंता न करता केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. डॉ. मैत्री यांनी सांगितले की, आई-वडील अशिक्षित असणे किंवा कौटुंबिक परिस्थिती बेताची असणे, हे प्रगतीमधील अडथळे ठरू शकत नाहीत. दुर्गम भागात राहूनही मनात जिद्द आणि मोठी स्वप्ने असतील, तर यशाचा मार्ग सुकर होतो. पैशांची किंवा संसाधनांची कमतरता उच्च शिक्षणात अडथळा ठरत नाही, कारण प्रामाणिक प्रयत्नांना अनेक मार्ग उपलब्ध होतात. विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करून स्वतःचे, गावाचे आणि देशाचे नाव उज्ज्वल करण्यासाठी कटिबद्ध राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
Source link
गडचिरोलीच्या आदिवासी विद्यार्थ्यांनी आयआयएम नागपूरला दिली भेट:नक्षलग्रस्त भागातून येऊन जागतिक शिक्षणाचे पाहिले स्वप्न