![]()
चांदवड वाघदर्डी-भडाणे शिवरस्ता काटेरी झुडुपांनी व्यापल्याने आणि रस्त्यावर गाळ साचल्याने शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत. वन्यप्राणी व विषारी सर्पांची भीती असल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी शाळा बुडवून थेट चांदवड तहसीलदारांकडे धाव घेत रस्ता मोकळा करण्याची मागणी केली. वाघदर्डी येथील जिल्हा परिषद शाळेत वाघदर्डी व भडाणे परिसरातील विद्यार्थी या शिवरस्त्याने ये-जा करतात. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काटेरी झुडुपे वाढल्याने मार्ग अरुंद झाला आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पाणी सोडल्यामुळे रस्त्यावर गाळ साचत असून, विद्यार्थ्यांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, झुडुपांमुळे रस्त्यावर बिबट्या, सर्प तसेच इतर वन्यप्राण्यांची हालचाल सहज दिसून येत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी परिसरातील १५ ते २० विद्यार्थ्यांनी तहसील कार्यालय गाठून तहसीलदार अनिल चव्हाण यांना निवेदन दिले. पालकांनी यापूर्वीही संबंधित मंडळ अधिकारी आणि महसूल यंत्रणेकडे तक्रारी केल्याचा दावा केला आहे. मात्र, आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून शिवरस्ता तातडीने मोकळा करावा, अशी मागणी पालकांनी केली आहे. यावेळी शिवाजी पगार, दीपक पगार, संतोष उगले, सोमनाथ कोल्हे, केशव पगार, पंडित पगार, राजेंद्र पगार, समाधान पगार आदी उपस्थित होते. वाघदर्डी-भडाणे शिवरस्ता मोकळा करण्यासाठी तहसीलदार यांच्या दालनात उपस्थित असलेले शाळकरी मुले. काट्याकुट्यांनी वेढलेला वाघदर्डी-भडाणे शिवरस्ता.
Source link
झुडुपांनी व्यापलेल्या वाघदर्डी-भडाणे रस्त्यामुळे विद्यार्थ्यांत भीतीचे वातावरण:शिवरस्ता खुला करण्यासाठी विद्यार्थी थेट तहसीलदारांच्या दालनात