Headlines

कळमनुरीत दोन गटात हाणामारीनंतर गोळीबार:एक ठार 4 जखमी, पोलिस बंदोबस्त वाढविला, 7 जण ताब्यात




कळमनुरी शहरातील बसस्थानक परिसरात दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर गोळीबार झाल्याने एक जण ठार तर चौघे जण जखमी झाल्याची घटना बुधवारी ता. 15 रात्री साडे आकरा ते पावनेबारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. यामध्ये दोन जखमींना तातडीने उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. कळमनुरी शहरात मोठा पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. पोलिसांनी तातडीने सात जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांची चौकशी केली जात आहे. याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी शहरालगत इंदिरानगर भागातील तरुण व पठाण मोहल्यातील काही तरुणांमध्ये मागील काही दिवसांपासून वाद सुरु होता. शाब्दीक चकमकीनंतर हा वाद शांत होत होता. मात्र आज रात्री साडे आकरा ते पावने बारा वाजण्याच्या सुमारास दोन्ही गटातील वाद पुन्हा पेटला. यामध्ये किरकोळ हाणामारीनंतर एक गटातील काही तरुणांच्या टोळक्याने गावठी कट्टे काढून त्यातून गोळीबार केला. यामध्ये लुकमान सिद्दीकी यांचा मृत्यू झाला असून असोमा पठाण, सारेक पठाण, सेहरअली पठाण, मेहराज पठाण हे जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी कळमनुरीच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी हिंगोलीच्या शासकिय रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले, कळमनुरीचे पोलिस निरीक्षक जमीर नाईक, सहाय्यक पोलिस निरीक्षक पुणे, उपनिरीक्षक दिलीप मोरे यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेतील आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तातडीने पथके रवाना केली आहेत. शहरात अनुचीत प्रकार घडू नये यासाठी पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.. या संदर्भात पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला असून या प्रकरणात सात जणांना ताब्यात घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर अन्य काही जणांना शोध सुरु असून त्यासाठी पथके रवाना केली आहेत. आपसातील जून्या वादातून हा प्रकार घडला असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *