![]()
आज शाश्वत शेतीसाठी मातीचे आरोग्य जपणे ही काळाची गरज आहे. मातीतील सेंद्रिय कर्ब, संतुलित अन्नद्रव्ये, योग्य सामू, सूक्ष्मजीवांची सक्रियता, दर्जेदार सिंचनाचे पाणी आणि योग्य पीक व्यवस्थापन हे जमिनीचे आरोग्य टिकवून ठेवणारे प्रमुख घटक आहे, असे प्रतिपादन उपप्राचार्य डॉ. सुनील बोरुडे यांनी केले. जमिनीचा पोत सुधारण्यासाठी महत्वाच्या उपाययोजनांचीही माहिती त्यांनी दिली. मुळा एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा फुले कृषी विद्यापीठ,राहुरी संलग्न कृषी महाविद्यालय सोनई यांच्या ग्रामीण (कृषि) जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत “शेतकऱ्यांच्या बांधावर तंत्रज्ञान प्रचार-प्रसार कार्यक्रम” कार्यक्रमा अंतर्गत खेडले परमानंद येथे संतोष घोरपडे यांच्या वस्तीवर “क्षारयुक्त जमिनीचे व्यवस्थापन” या विषयावर शेतकरी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राला परिसरातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाच्या प्रारंभी कृषीकन्यांनी उपस्थित मान्यवर व शेतकरी बांधवांचे स्वागत केले. चर्चासत्राची उद्दिष्टे स्पष्ट करून शेतकऱ्यांना मोकळेपणाने आपल्या समस्या मांडण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी शेतकरी व गावातील युवकांनी क्षारयुक्त जमिनीमुळे होणाऱ्या समस्या, ऊस पिकातील घटते उत्पादन, माती परीक्षण, अन्नद्रव्यांची कमतरता, सिंचनाचे नियोजन, खतांचे संतुलित व्यवस्थापन तसेच आधुनिक शेतीतील विविध अडचणी यासंदर्भातील प्रश्न उपस्थित केले. प्रा. जयसिंग वाघमारे (मृदा विज्ञान व कृषि रसायनशास्त्र विभाग) यांनी क्षारयुक्त जमिन होण्याची कारणे, माती परीक्षण, जमिनीतील अन्नद्रव्यांची उपलब्धता तसेच क्षारयुक्त जमिनीच्या सुधारणा उपाययोजना याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी सेंद्रिय खतांचा वापर, पिकांचे अवशेष (पाचट) जमिनीत मिसळणे, जिप्समचा योग्य वापर, संतुलित खत व्यवस्थापन आणि योग्य निचरा व्यवस्था यांमुळे जमिनीची सुपीकता वाढविता येते, असे सांगितले. प्रगतशील सेंद्रिय शेतकरी सूर्यभान आघाव यांनी आपल्या प्रत्यक्ष शेतीतील अनुभवांवर आधारित मार्गदर्शन करत ऊस पिकातील सेंद्रिय व्यवस्थापन, कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविण्याच्या पद्धती, सेंद्रिय खतांचा प्रभावी वापर तसेच शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड पारंपरिक अनुभवाशी देण्याची गरज अधोरेखित केली. त्यांच्या अनुभवांचा उपस्थित शेतकरी व युवकांना मोठा लाभ झाला. कार्यक्रमास कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हरी मोरे, कार्यक्रम समन्वयक प्रा. अनुप दरंदले प्रा. दिशा चव्हाण, डॉ. संतोष चौगुले प्रा. नरेंद्र दहातोंडे आदींनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत संशोधनाधारित कृषी तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी अशा बांधावरील चर्चासत्रांचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाचे नियोजन, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृषीकन्या सिद्धी माळवदे, शिवानी चौधरी, भक्ती मांजरेकर, साक्षी कानगुडे, पल्लवी मंडलिक व साक्षी भोगल यांनी केले. शाश्वत शेतीसाठी आधुनिक पद्धतींचा अवलंब आवश्यक प्रा. राहुल गडाख यांनी ऊस पिकाचे शास्त्रशुद्ध व्यवस्थापन, माती परीक्षण अहवालानुसार खतांचा वापर, पीक उत्पादन वाढीसाठी आवश्यक कृषी तंत्रज्ञान तसेच शाश्वत शेतीसाठी आधुनिक पद्धतींचा अवलंब करण्याबाबत मार्गदर्शन केले. उपस्थित शेतकरी व युवकांच्या प्रश्नांचे समाधानकारक निरसन करण्यात आले.
Source link
शाश्वत शेतीसाठी शेत जमिनीचे आरोग्य जपणे ही काळाची गरज, डॉ. बोरुडे यांचे प्रतिपादन, खेडले परमानंद येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन