![]()
राज्याचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशान्वये भेसळयुक्त अन्नपदार्थ व अस्वच्छतेविरोधात सध्या तीव्र मोहीम राबवण्यात येत आहे. याच मोहिमेंतर्गत जठारपेठ चौक, तापडियानगरातील “मे. गणेश स्वीट मार्ट’ वर अन्न व औषध प्रशासनाने बुधवारी कारवाई केली. तपासणीदरम्यान या ठिकाणी अत्यंत गंभीर स्वरूपाची अस्वच्छता आढळून आल्याने, सार्वजनिक आरोग्याच्या हितास्तव या पेढीचा अन्न व्यवसाय परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित करण्यात आला आहे. अकोल्याचे सहाय्यक आयुक्त (अन्न) दे. गो. वीर यांच्या मार्गदर्शनात अन्नसुरक्षा अधिकारी र. वा. सोळंके व की. ह. बोरचाटे यांनी बुधवारी स्वीट मार्टची पाहणी केली. तपासणीत अन्नसुरक्षा कायद्यातील परिशिष्ट क्र. ४ मधील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले. या सर्व गंभीर बाबींमुळे ग्राहकांच्या आरोग्याला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असल्याने, ‘मे. गणेश स्वीट मार्ट’चा अन्न व्यवसाय परवाना तत्काळ निलंबित करून व्यवसाय बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शहरातील इतर अस्वच्छ अन्न व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. आस्थापनेत सर्वत्र मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता पसरलेली होती. भिंती, छत आणि खिडक्यांवर तेलकट कीटन व काजळी साचलेली आढळली. एक्झॉस्ट आणि चिमणी अत्यंत खराब स्थितीत होती. भांडी धुण्याच्या जागेत सांडपाणी आणि खरकटे साचून होते. तसेच, तेथे भांडी स्वच्छ धुण्यासाठी गरम पाण्याची कोणतीही सोय नव्हती. यामुळे करण्यात आली कारवाई अन्नसुरक्षा कायद्याचे उल्लंघन व आरोग्याशी खेळणाऱ्या या अस्वच्छतेमुळे अधिकाऱ्यांनी कडक पावले उचलली आहेत. गणेश स्वीट मार्टच्या मालकाला या सर्व त्रुटींची पूर्तता व साफसफाई करेपर्यंत व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वीही आस्थापनेला तपासणीअंती वेळ देण्यात आला होता, मात्र, आस्थापनेने त्याची पूर्तता केली नाही. त्यामुळे एफडीएच्या अधिकाऱ्यांनी आता थेट कारवाई केली.
Source link
एफडीएची कारवाई:‘गणेश स्वीट मार्ट'वर छापा; अस्वच्छतेमुळे परवाना निलंबित, दुकानात घाणीचे साम्राज्य, अन्न सुरक्षा नियमांचे गंभीर उल्लंघन