![]()
गणेश विसर्जन मिरवणुकीतील साउंड सिस्टिमवरील बंदी आणि निर्बंधांबाबत प्रशासनाने पुनर्विचार करावा, अशी मागणी पुणे जिल्हा साउंड व लाईट जनरेटर असोसिएशनने केली आहे. असोसिएशनचे अध्यक्ष गणेश काळभोर यांनी पत्रकार परिषदेत हे मत मांडले. काळभोर म्हणाले की, राजकीय, लग्न, हळदीचे कार्यक्रम तसेच इतर सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये वाजवली जाणारी गाणी हा आमचा व्यवसाय आहे. साउंड सिस्टिमवर आधारित उपजीविका करणारे हजारो लोक आहेत. प्रशासनाने आवाजाची मर्यादा घालून दिल्यास आम्ही त्या मर्यादेतच गाणी वाजवू. डीजेवर बंदी घालण्याऐवजी पोलिसांनी घालून दिलेले नियम आम्हाला मान्य आहेत. साउंड सिस्टिमसाठी केवळ चार टॉप आणि चार बेस हा निर्णय आम्हाला मान्य आहे. गणेश मंडळांमधील आवाजाची स्पर्धा कमी करावी. ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी निर्धारित ध्वनी मर्यादा आणि वेळेचे नियम लागू ठेवून साउंड सिस्टिमला परवानगी द्यावी. सर्व गणेश मंडळांना समान आणि स्पष्ट नियम लागू करावेत, अशी मागणीही त्यांनी केली. काळभोर यांनी सांगितले की, प्लाझ्मा आणि लेझर सिस्टिमवर बंदी घातल्यानंतर आम्ही कोट्यवधी रुपयांच्या सिस्टिम पॅक करून विक्रीसाठी काढल्या आहेत. मिरवणुकीदरम्यान आम्ही अश्लील गाणी वाजवत नाही, ती संबंधित कार्यकर्त्यांची मागणी असते. मात्र, यंदा अश्लील गाणी न वाजवण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. सध्या आमच्या स्थानिक साउंड सिस्टिमला कमी मागणी आहे, कारण इतर राज्यांमधून साउंड सिस्टिम मागवण्यात येत आहेत. यामुळे स्थानिक रोजगारावर वाईट परिणाम होत आहे. गणेश मंडळांनी महाराष्ट्राबाहेरून साउंड सिस्टिम मागवू नये, अशी विनंती असोसिएशनने केली आहे. व्यावसायिकांचा दरवर्षी २० ते २५ लाखांचा आर्थिक व्यवहार होत होता, पण यंदा २५ हजार रुपये मिळणेही अवघड झाले आहे. पुणे जिल्ह्यात ३० हजार व्यावसायिक असून, त्यांच्यावर आधारित तीन ते चार लाख लोकांच्या उपजीविकेवर परिणाम होणार आहे. आम्ही दरवर्षी नवीन गुंतवणूक करून कर्ज काढून साउंड सिस्टिम अद्ययावत करतो. मात्र, डीजे बंदीमुळे प्रशासन दरवर्षी नियमांमध्ये बदल करते आणि आम्हाला आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. त्यामुळे प्रशासनाने याबाबत एकदाच नियमावली करावी, अशी मागणी त्यांनी केली. डीजे व्यवसाय छोटा नसून देशात १४ हजार कोटींचा हा व्यवसाय आहे. कायदेशीर पद्धतीने व्यवसाय करताना सरकारला जीएसटीच्या माध्यमातून २५ कोटी रुपये कर भरला जातो. वर्षभरात आम्ही केवळ १०० दिवस काम करतो, पण कामगारांना वर्षभर सांभाळतो. कर्णकर्कश आवाज बंद करण्यास आमचे समर्थन आहे, असेही काळभोर यांनी स्पष्ट केले. या पत्रकार परिषदेला गजेंद्र मोरे, सागर सुतार, राजू सोनवणे आणि मनोज भोसले उपस्थित होते. लवकरच डीजेच्या समर्थनासाठी पुण्यात गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसोबत मोर्चा काढला जाईल, असे मोरे यांनी यावेळी सांगितले.
Source link
गणेश विसर्जनातील साउंड सिस्टिम बंदीवर पुनर्विचार करा: असोसिएशनची मागणी:'चार टॉप-चार बेस मान्य, पण स्थानिक रोजगारावर परिणाम होत आहे'