![]()
पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी एका नामांकित कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचे बनावट व्हॉट्सअॅप खाते तयार करून कंपनीतील कर्मचाऱ्याची २ कोटी २० लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांना अटक केली आहे. आरोपींनी बनावट व्हॉट्सअॅप खात्यावर कंपनीच्या मालकाचा फोटो आणि नाव वापरून कर्मचाऱ्याचा विश्वास संपादन केला होता. त्यानंतर विविध बँक खात्यांमध्ये पैसे पाठवण्यास सांगून ही फसवणूक केली, असे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार हे एका ऑटो शोरूम कंपनीतील वरिष्ठ अधिकारी आहेत. त्यांना एका व्हॉट्सअॅप क्रमांकावरून कंपनीच्या मालकाच्या नावाने संदेश आले. त्या खात्याच्या प्रोफाइलवर कंपनीच्या मालकाचा फोटो आणि नाव असल्याने तक्रारदारांचा विश्वास बसला. आरोपींनी त्यांना विविध बँक खात्यांची माहिती पाठवून त्यात पैसे जमा करण्यास सांगितले. त्यानुसार, एकूण २ कोटी २० लाख रुपयांची रक्कम वेगवेगळ्या खात्यांमध्ये पाठवण्यात आली. मात्र, आरोपींकडून वारंवार पैशांची मागणी होत असल्याने तक्रारदारांना संशय आला. त्यांनी कंपनीच्या मालकाशी संपर्क साधला असता, त्यांच्या नावाने बनावट व्हॉट्सअॅप खाते तयार करून फसवणूक केल्याचे समोर आले. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६(सी) आणि ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांत्रिक तपास करताना पोलिसांनी एका आयडीबीआय बँक खात्याचा माग काढला. त्यातून संशयितांची ओळख पटवली. आरोपींनी सायबर फसवणुकीतील रकमेच्या व्यवहारांसाठी अनेक बँक खाती वापरली होती, असे तपासात निष्पन्न झाले आहे. यातील काही रक्कम धनादेश आणि एटीएमद्वारे काढण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे. या प्रकरणात संजय पराग चव्हाण (वय २०), रमेशकुमार शंकरलाल पुनिया (वय २४) आणि प्रकाश गोवर्धनराम पवार (वय २०) या तिघांना अटक करण्यात आली आहे. आरोपी पुनिया आणि पवार हे मूळचे जोधपूर, राजस्थान येथील असून, ते सध्या पनवेल परिसरात राहत होते. पोलीस निरीक्षक दिगंबर गायकवाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, कंपनीचे मालक, मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावाने व्हॉट्सअॅपवरून पैशांची मागणी झाल्यास, प्रत्यक्ष संपर्क करून खात्री केल्याशिवाय कोणतीही रक्कम पाठवू नये.
Source link
बॉस स्कॅमद्वारे कंपनीच्या अधिकाऱ्याची 2.20 कोटींची फसवणूक:बनावट व्हॉट्सअॅप खात्यावर मालकाचा फोटो वापरून विश्वास संपादन; तिघांना अटक