Headlines

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का!:जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द, पुढील सहा वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र




शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून विशाखा राऊत यांचे नगरसेवकपद रद्द होणार आहे. पालघरच्या जात पडताळणी समितीने त्यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द ठरवले होते, ज्याविरोधात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता उच्च न्यायालयानेही त्यांची याचिका फेटाळून लावल्याने ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा फटका मानला जात आहे. राऊत यांनी दादरमधील अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या वॉर्ड क्रमांक 191 मधून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार सदा सरवणकर यांची कन्या प्रिया सरवणकर-गुरव यांचा पराभव केला होता. मात्र, जात प्रमाणपत्राच्या मुद्द्यावरून आता त्यांना आपले पद गमवावे लागणार आहे. उच्च न्यायालयाचा दणका विशाखा राऊत यांचे ओबीसी प्रमाणपत्र पालघरच्या जात पडताळणी समितीने अवैध ठरवले होते. या निर्णयानंतर त्यांचे नगरसेवकपद रद्द झाल्याचे जाहीर करावे, असा पत्रव्यवहार मुंबई महापालिकेने राज्य सरकारशी केला होता. या कारवाईला आक्षेप घेत राऊत यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून दाद मागितली होती. परंतु, न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यामुळे त्यांचे नगरसेवकपद जाणे आता निश्चित झाले आहे. महापालिका आयुक्तांचे सरकारला पत्र यासंदर्भात पालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे यांनी 25 ऑगस्ट रोजी राज्याच्या नगरविकास विभागाच्या अपर मुख्य सचिवांना अधिकृत पत्र पाठवले आहे. 20 ऑगस्ट रोजी जात प्रमाणपत्र अवैध ठरवण्यात आल्याने, मुंबई महापालिका अधिनियमातील तरतुदींनुसार राऊत यांची निवड रद्द झाल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच, पद रद्द झाल्यामुळे त्या पुढील सहा वर्षे निवडणूक लढवण्यास अपात्र ठरल्या असून, ही बाब महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध करण्याची विनंती आयुक्तांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *