![]()
धुळे-सुरत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वरील कोंडाईबारी घाटातील तीव्र उतारावर ब्रेक फेल झाल्याने साबण निर्मितीसाठी वापरण्यात येणारे केमिकल घेऊन गुजरातच्या दिशेने जाणारा टँकर अनियंत्रित होऊन कारवर उलटल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत कारमधील सोनगड येथील शकीलभाई कुरेशी यांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या दोन महिला व एक पुरुष गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, GJ 16 AU 2487 क्रमांकाचा केमिकल टँकर कोंडाईबारी घाटातून गुजरातच्या दिशेने जात होता. घाटातील तीव्र उतारावर अचानक टँकरचे ब्रेक फेल झाले. त्याचवेळी पुढे गतिरोधक असल्याने महामार्गावर वाहनांची मोठी रांग लागली होती. दरम्यान, GJ 05 CK 7026 क्रमांकाची कार धुळ्याहून सोनगडच्या दिशेने जात होती. धुळ्याला मुस्लिम समाजातील एका कुटुंबातील सदस्य मयतीसाठी गेले होते. तेथून परतताना त्यांची कार कोंडाईबारी घाटातील गतिरोधकाजवळ वाहनांच्या रांगेत अडकली होती. कारचालकाने मागील आरशातून पाहिले असता ब्रेक फेल झालेला टँकर वेगाने आपल्या दिशेने येत असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने कार बाजूला घेण्याचा प्रयत्न केला; मात्र पुढेही वाहनांची रांग असल्याने कारला सुरक्षितपणे बाजूला घेण्यासाठी पुरेशी जागा मिळाली नाही. काही क्षणांतच अनियंत्रित झालेला भरधाव टँकर कारवर उलटला. टँकरखाली कार पूर्णपणे दबली गेल्याने कारमधील शकीलभाई गफुर कुरेशी (खाटिक) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत प्रवास करणाऱ्या नजमा गफूर खाटीक (वय 70, रा. सोनगड), जफराना फारुख शेख (वय 52, रा. नवापूर) आणि राहुल चौधरी (रा. सोनगड) हे तिघे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक प्रवासी, नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. कारमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढून पुढील उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक पोलिसांसह स्थानिक यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली. टँकरमधील चालकासह कारमधील प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी बचावकार्य करण्यात आले. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा टँकर महामार्गावर आडवा झाल्याने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अपघातग्रस्त वाहने हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न महामार्ग पोलिसांकडून सुरू आहेत. अपघातामुळे कोंडाईबारी घाटातील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली असून, घटनास्थळी पोलिसांकडून पुढील कार्यवाही सुरू आहे.
Source link
कोंडाईबारी घाटात भीषण अपघात!:ब्रेक फेल झालेला केमिकल टँकर कारवर उलटून एकाचा मृत्यू, 3 गंभीर जखमी