“राज्यात गेल्या 80 दिवसांपासून पाऊस पडलेला नाही, दुष्काळामुळे पिके करपून गेली आहेत. सरकार मात्र पंचनामे, अभ्यास आणि केंद्रीय समित्यांचा निव्वळ बोगस खेळ खेळून शेतकऱ्यांची क्रूर फसवणूक करत आहे. दुसरीकडे, मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्
.
मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील भीषण दुष्काळ, कायदा-सुव्यवस्थेचा वाजलेला बोजवारा, 500 कोटींची कथित ऑडिओ क्लिप आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्यावर गंभीर आरोप केले.
शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाख रुपये मदत अन् संपूर्ण कर्जमाफी द्या!
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना सपकाळ यांनी शासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. “गेल्या 80 दिवसांपासून पाऊस नसल्यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने हा पंचनाम्यांचा बोगसपणा थांबवून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट हेक्टरी 1 लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान जमा करावे आणि संपूर्ण कर्जमाफी जाहीर करावी. फडणवीस हे जनतेचे मुख्यमंत्री नसून केवळ उद्योगपतींचे आणि गुंडांना संरक्षण देणारे मुख्यमंत्री आहेत.”
चारा छावण्या आणि 200 दिवस रोजगार
“जनावरांसाठी तत्काळ चारा छावण्या सुरू कराव्यात. मजुरांचे स्थलांतर रोखण्यासाठी जुन्या रोजगार हमी योजनेच्या धर्तीवर गावातच 200 दिवस कामाची हमी द्यावी. शेतमजुरांना सानुग्रह अनुदान आणि उज्ज्वला योजनेतील 12 गॅस सिलिंडर मोफत द्यावेत.”
शिक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र
“नांदेडमध्ये एका शेतकऱ्याने फिजिओथेरपी शिकणाऱ्या मुलीची फी भरता न आल्याने आत्महत्या केली. फडणवीसांच्या कर्जमाफीच्या 3 याद्यांमध्ये तो बसला नाही. त्यामुळे दुष्काळ संपेपर्यंत विद्यार्थ्यांचे एसटी पासेस मोफत करावेत आणि शाळा-कॉलेजांमधील ट्युशन व कॅपिटेशन फी पूर्णपणे माफ करावी.”

500 कोटींच्या व्यवहाराची ईडी चौकशी करा
मनोज जरांगे पाटील यांनी उघडकीस आणलेल्या ऑडिओ क्लिपवर बोलताना सपकाळ म्हणाले, “या ऑडिओ क्लिपमधून भाजपचे कारस्थानी रूप समोर आले आहे. सत्तेसाठी साम, दाम, दंड, भेद वापरून आंदोलने फोडणे, लोकांना बदनाम करणे आणि विकत घेणे ही यांची नीती आहे. 500 कोटींचा आरोप जाहीर सभेत झाला असून त्याचा सक्षम पुरावा पुढे आला आहे.”
ईडीने तत्काळ कारवाई करावी
“भाजपने हे 500 कोटी कुठून आणले? त्याचे वाटप कसे झाले? या संभाषणात खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थेट नावे असल्याने ईडीने या दोघांनाही तात्काळ अटक करावी आणि या संपूर्ण आर्थिक घोटाळ्याचा पर्दाफाश करावा. महायुती म्हणजे तिहेरी इंजिनच्या सरकारची गँग असून त्यांच्यात एकमेकांवर कुरघोडी करण्याचे टोळीयुद्ध सुरू आहे.”
बिश्नोई अमित शहांचा जावई आहे का?
मुंबईतील वाढती गुन्हेगारी आणि बॉलिवूडमधील दहशतीवर त्यांनी फडणवीसांना उघड आव्हान दिले. “टोळीयुद्ध संपले होते, मात्र आता पुन्हा गुंडांनी डोके वर काढले आहे. सरकारच्या नाकाखाली आणि मंत्रालयाच्या उंबरठ्यावर टायगर श्रॉफच्या घरावर हल्ले होत आहेत. हा कायदा व सुव्यवस्थेचा पूर्ण बोजवारा असून सध्या ‘पांडू हवालदार’ आणि ‘घाशीराम कोतवाल’ राज्य चालवत आहेत.”
अमित शहा मास्टरमाइंड असल्याचा आरोप
“लॉरेन्स बिश्नोई हा सरकारचा जावई आहे का? अमित शाह हेच या बिश्नोई गँगचे सर्वेसर्वा आणि मास्टरमाइंड असल्याचे बोलले जात आहे. माजी मंत्र्यांची हत्या होते, विद्यमान आमदारांना धमक्या दिल्या जातात आणि गृहखाते निष्क्रिय राहते. फडणवीसांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी गुजरातमधून बिश्नोईला ओढून आर्थर रोड जेलच्या अंडा सेलमध्ये आणावे.”
हरदीप पुरी-एपस्टीन कनेक्शन आणि नवी डॉक्युमेंट्री
भाजप नेत्यांवर आरोप करताना ते म्हणाले, “केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी जेफ्री एपस्टीन प्रकरणात लिप्त असल्याचे छायाचित्रांवरून उघड झाले आहे. पुरी यांनी ‘कधीही एकट्यात भेटलो नाही’ असा दावा केला होता, मात्र समोर आलेल्या फोटोंमध्ये ते एका खासगी केबिनमध्ये एकटेच बसल्याचे दिसत आहे. जगात ज्यांची नावे एपस्टीन प्रकरणात आली त्यांनी राजीनामे दिले, मात्र मोदी सरकार पुरींना वाचवत आहे.”
फडणवीसांच्या मित्रांचा भंडाफोड करणार
“राज ठाकरे यांनी शेअर केलेली ‘फ्रेंडशिप फाइल्स’ डॉक्युमेंट्री दाबण्यासाठी पोलिसांचा वापर केला जात आहे. ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य बदलून पोलिसांनी ‘ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है’ असे नवीन ब्रीदवाक्य स्वीकारले आहे का? लवकरच आम्ही देवेंद्र फडणवीस यांचे कोण कोण उद्योगपती मित्र आहेत, त्यांना मुंबईतील जमिनी कशा वाटल्या गेल्या, यावर नवी डॉक्युमेंट्री प्रकाशित करून त्यांचा बुरखा फाडणार आहोत,” असा इशाराही हर्षवर्धन सपकाळ यांनी शेवटी दिला.
———————————————————————
हेही वाचा…
माझ्याविरोधात बोलणाऱ्यांना भाजपने पार्टी फंड पुरवला!: मनोज जरांगेंकडून 500 कोटींच्या दाव्याची स्फोटक ऑडिओ क्लिप जाहीर; शिंदे-फडणवीसांना षड्यंत्र थांबवण्याचा इशारा

“मराठा आरक्षण आंदोलन चिरडण्यासाठी, मला बदनाम करण्यासाठी आणि आंदोलनात फूट पाडण्यासाठी गेल्या 3 वर्षांपासून सत्ताधारी वर्तुळात एक अतिशय भयानक आणि नियोजनबद्ध कट शिजत आहे. माझ्या विरोधात बोलणाऱ्या मराठा तरुणांनाच हाताशी धरून, त्यांना पक्षाचा किंवा वैयक्तिक फंड पुरवून, गाड्या आणि मोर्चांचा खर्च देऊन मला राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करण्याची रणनीती आखली गेली. ‘बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला’ म्हणणाऱ्यांनी आता हे पुरावे ऐकावेत. जर हे षड्यंत्र थांबवले नाही, तर माझ्याकडे असा महास्फोट आहे की या राज्यात सत्ताधाऱ्यांना पाय ठेवायलाही जागा उरणार नाही,” असा खळबळजनक इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी