![]()
“मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जाहीर केलेल्या ऑडिओ क्लिपची पोलीस प्रशासनामार्फत सखोल चौकशी झाली पाहिजे. पोलिसांवर विश्वास नसेल तर त्यांनी थेट न्यायालयाकडे दाद मागावी, आम्हीही त्याचा पाठपुरावा करू. मात्र, जर ही चर्चा 3 वर्षांपूर्वीची होती, तर मग ही क्लिप 3 वर्षे स्वतःकडे का दाबून ठेवली? ती आत्ताच कशी आली? ती जरांगेंपर्यंत कोणी पोहोचवली आणि आत्ताच देण्यामागे कोणाचा काय हेतू होता? या सर्वांचा छडा त्या चौकशीतून लागलाच पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून असा कोणताही आर्थिक व्यवहार झालेला नाही,” अशी स्पष्ट भूमिका शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पत्रकार परिषदेत मांडली आहे. नाशिक येथे शिवसेनेच्या (शिंदे गट) प्रमुख पदाधिकारी बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत दादा भुसे यांनी मनोज जरांगे यांच्या आरोपांवर, आगामी 26 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौऱ्यावर आणि 31 ऑक्टोबरच्या धर्मध्वज उभारणी कार्यक्रमावर सविस्तर भाष्य केले. 500 कोटींचा संबंध नाही; जरांगेंनी पोलिसांत जाऊन चौकशी मागावी जरांगे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलेल्या ऑडिओ क्लिपवर बोलताना भुसे म्हणाले, “मनोज जरांगे पाटील यांनी जो काही पुरावा दिला असेल, त्याची पोलीस प्रशासनामार्फत चौकशी झाली पाहिजे. काल स्वतः मी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी खुलासा केला आहे की, ना शिंदे साहेबांकडून ना डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून असा कोणताही व्यवहार झालेला नाही. जर जरांगे पाटलांना पोलिसांवर विश्वास नसेल तर त्यांनी थेट न्यायालयाकडे मागणी करावी, आम्हीही त्या चौकशीचा पाठपुरावा करू.” 3 वर्षांनंतर टायमिंग का साधले? “या संभाषणात विधानसभा निवडणुकीचा उल्लेख असल्याचे सांगितले जाते. जर हा विषय 3 वर्षांपासूनचा होता, तर मग तो आत्तापर्यंत का थांबवून ठेवला? आत्ताच ही क्लिप कोठून आली? कोणी पुरवली? त्या चर्चेत कोण होते आणि त्यांच्या भूमिका काय होत्या? यामागे कोण मास्टरमाइंड आहे, हे केवळ चौकशीतूनच समोर येईल.” शिंदेंनी मराठ्यांना 10 टक्के आरक्षण दिले एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजासाठी घेतलेल्या निर्णयांचा दाखला देत त्यांनी नाराजी व्यक्त केली. “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण शिकवले. रयतेला पोटाशी धरून काम करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण पुढे नेत मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेंनी मराठा समाजातील मागास घटकांसाठी अनेक महत्त्वाकांक्षी निर्णय घेतले. अधिसंख्य पदे निर्माण करणे असो किंवा एसईबीसी (SEBC) प्रवर्गातून 10 टक्के आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय असो, शिंदेंनी नेहमीच न्याय दिला.” आदर बाळगला पाहिजे “जरांगे पाटील यांनी मागास मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आंदोलने केली, त्याला शिंदे साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. मात्र, असे असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांविषयी चुकीचे व हीणकस शब्दप्रयोग वापरणे अत्यंत चुकीचे आहे.” जरांगेंच्या ‘षड्यंत्रा’च्या दाव्यावर खुलासा जरांगे यांनी पत्रकार परिषदेत भुसे यांच्या नावाचा उल्लेख केल्याबाबत विचारले असता ते म्हणाले, “जरांगे पाटलांनी माझ्या विरोधात षड्यंत्र रचले जात असल्याचे मला कधीही सांगितले नव्हते. त्यांच्याकडून कधी गोरगरीब मराठा बांधवांच्या संदर्भातील काही कायदेशीर किंवा नियमातील मागण्या आल्या, तर त्या पुढे नेण्याचे काम मी नक्कीच केले आहे आणि ते काम आम्ही सर्वांसाठीच करतो.” प्रत्येक कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा वाटतो “एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार, या चर्चेबाबत विचारले असता भुसे म्हणाले की, प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला आपला नेता मुख्यमंत्री व्हावा असे वाटणे स्वाभाविक आहे, त्यात गैर काहीच नाही. अंतिम निर्णय पक्षाचे मुख्य नेते घेतील.” 26 ऑक्टोबरला एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर नाशिक जिल्ह्यातील आगामी राजकीय व सामाजिक कार्यक्रमांची माहिती देताना दादा भुसे यांनी सांगितले. नाशिककरांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 26 ऑक्टोबर रोजी नाशिक दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात नगरविकास विभागाच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण होईल. तसेच राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने स्थानिक पातळीवर शेतकरी बांधवांना थेट मदतीचे वाटप केले जाईल आणि साधू-महंतांशी संवाद साधला जाईल. 31 ऑक्टोबरला धर्मध्वज उभारणी नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या धर्मध्वज उभारणी कार्यक्रमाचे निमंत्रण महामहीम राष्ट्रपतींना देण्यात आले असून, त्यांनी ते स्वीकारले आहे. कुंभमेळा सर्वांचा असल्याने सर्व घटकांनी एकत्र येऊन तो यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले. हेही वाचा… माझ्याविरोधात बोलणाऱ्यांना भाजपने पार्टी फंड पुरवला!:मनोज जरांगेंकडून 500 कोटींच्या दाव्याची स्फोटक ऑडिओ क्लिप जाहीर; शिंदे-फडणवीसांना षड्यंत्र थांबवण्याचा इशारा “गेल्या 3 वर्षांपासून मराठा आरक्षण आंदोलन मोडून काढण्यासाठी आणि गरीब मराठ्यांच्या लेकरांचे हक्क संपवण्यासाठी सत्ताधाऱ्यांकडून अत्यंत भयंकर व गलिच्छ षड्यंत्र रचले जात आहे. माझ्याच समाजातील काही पोरांना हाताशी धरून, त्यांना भाजपचा पार्टी फंड, उद्योगपतींचा पैसा, मोर्चे आणि गाड्यांचा खर्च पुरवून माझ्याविरोधात रान उठवले गेले. ‘बाप दाखवा नाहीतर श्राद्ध घाला’ म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे वस्त्रहरण करणारा 32 मिनिटांचा पुरावा आज मी अखंड महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हे षड्यंत्र तत्काळ थांबवले नाही, तर 1 ते 2 महिन्यांत असा बॉम्ब टाकेन की या राज्यात 2029 ला एकालाही तोंड दाखवायला किंवा पाय ठेवायला जागा उरणार नाही,” असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. सविस्तर वाचा….
Source link
3 वर्षांनी 'ती' क्लिप आत्ताच कशी आली, कोणी पुरवली?:जरांगेंनी पोलिसांकडे जाऊन खुशाल चौकशी लावावी; शिक्षणमंत्री दादा भुसेंचे थेट प्रत्युत्तर