![]()
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली असून, लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणासाठी पक्षाकडून आंदोलन करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई उत्तर-पश्चिम जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने गुरुवारी आंदोलन करण्यात आले. ‘लोकशाही बचाव, संविधान बचाव’, ‘SIR रद्द करा’ आणि ‘ज्ञानेशकुमार राजीनामा द्या’ अशा घोषणा देत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत आपला विरोध व्यक्त केला. दरम्यान, आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरावलोकनाच्या (SIR) प्रक्रियेला विरोध दर्शवत युवक काँग्रेसने हे आंदोलन केले. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित करत आंदोलकांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या मागण्यांसंदर्भात संबंधित प्रशासनाला निवेदन देण्याची तयारीही आंदोलकांनी केली होती. तहसीलदारांना निवेदन देण्यापूर्वीच धरपकड आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे एक शिष्टमंडळ तहसीलदारांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे अधिकृत निवेदन सादर करणार होते. मात्र, शिष्टमंडळाची भेट होण्यापूर्वीच पोलिसांनी आंदोलकांची धरपकड केली. त्यामुळे निवेदन सादर करण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण झाल्याचे युवक काँग्रेसकडून सांगण्यात आले. पोलिसांच्या या कारवाईमुळे आंदोलनाचा मुद्दा अधिकच चर्चेत आला. ‘विरोधकांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न’ पोलिसांच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना मुंबई उत्तर-पश्चिम जिल्हा युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष अब्दुल समद यांनी सरकारवर टीका केली. पोलिसांच्या माध्यमातून युवक काँग्रेसचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला असला, तरी हे आंदोलन थांबणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचा आवाज कोणीही दडपू शकत नाही, असे समद म्हणाले. सरकार पोलिसांना पुढे करून विरोधी पक्षांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. मतदार यादी आणि निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततांविरोधातील ‘वोटचोरी’चे आंदोलन यापुढेही सुरूच राहील, असा इशारा त्यांनी दिला. आंदोलन सुरूच ठेवण्याचा युवक काँग्रेसचा निर्धार लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणाचा मुद्दा पुढे करत युवक काँग्रेसने आपल्या मागण्यांवर ठाम भूमिका घेतली आहे. ‘SIR’ प्रक्रिया रद्द करणे आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी मान्य होईपर्यंत आंदोलनाची भूमिका कायम ठेवणार असल्याचे अब्दुल समद यांनी सांगितले. त्यामुळे मुंबईतील युवक काँग्रेसच्या या आंदोलनातून निवडणूक प्रक्रियेवरून काँग्रेस आणि सरकार यांच्यातील राजकीय संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची चिन्हे आहेत. हेही वाचा…. शीव, विद्याविहार अन् गोरेगावमधील उड्डाणपुलांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण:मुंबईकरांचा प्रवास होणार वेगवान, वेळ आणि इंधनाचीही बचत मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करून प्रवास अधिक वेगवान आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने मुंबई महानगरपालिकेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. शीव रेल्वे स्थानकाजवळील नवीन रेल्वे उड्डाणपूल, विद्याविहार रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे उड्डाणपूल आणि गोरेगाव-मुलुंड जोड मार्गावरील उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी दृकश्राव्य माध्यमातून पार पडले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या 3 उड्डाणपुलांमुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळण्यासोबतच प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत होण्यास मदत होणार आहे. सविस्तर वाचा…
Source link
ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याची मागणी:मुंबईत युवक काँग्रेसचे आंदोलन, आंदोलकांची धरपकड