![]()
नागपूर शहरात अमली पदार्थांच्या तस्करांविरोधात गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई सुरूच ठेवली आहे. पाचपावली पोलिस स्टेशनच्या हद्दीतून १० लाख २८ हजार रुपये किमतीचा तब्बल २० किलो ५८५ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून, एक फरार आरोपीचा शोध सुरू आहे. कारवाईदरम्यान वाहने आणि मोबाईलसह एकूण १८ लाख १५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई १ सप्टेंबरच्या रात्री ११ ते २ सप्टेंबरच्या मध्यरात्री १.४० वाजेदरम्यान ताज नगर टेका येथील मुस्लिम कब्रस्तानसमोर सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आली. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलिस उपनिरीक्षक नागेश पुन्नावाड यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. अटक केलेल्या आरोपींमध्ये शेख इम्रान उर्फ बाबा शेख मुख्तार (रा. जाफर नगर, नागपूर), शेख आबीद उर्फ अबू शेख अनवर (रा. गुटखाला तलाव परिसर, चंद्रपूर), फैजान रजा अब्दुल जब्बार शेख (रा. दादमालवाड, चंद्रपूर) आणि मोहम्मद जुनेद मोहम्मद इब्राहिम राजवाडी (रा. वनदेवी नगर, नागपूर) यांचा समावेश आहे. यातील आरोपी शेख इम्रान हा अट्टल एनडीपीएस गुन्हेगार अनीस ड्रम याचा साडू आहे. हॅपी उर्फ पाजी उर्फ हरप्रीत सैनी (रा. दीक्षित नगर, नागपूर) हा फरार आहे, त्याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी २० किलो ५८५ ग्रॅम गांजा (किंमत १०,२८,२५० रुपये), ३१ हजार रुपयांचे ४ मोबाईल फोन, ५ लाख रुपये किमतीची हुंडई कार आणि २ लाख ५० हजार रुपयांचा ऑटो रिक्षा असा एकूण १८ लाख १५ हजार ७५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पुढील तपास पाचपावली पोलिस करत आहेत.
Source link
नागपुरात 10 लाखांचा 20 किलो गांजा जप्त:पाचपावली पोलिसांनी 4 आरोपींना पकडले, एक जण फरार