![]()
नागपूरमधील कोराडी औष्णिक वीज केंद्रात एका ६१ वर्षीय कंत्राटी कामगाराचा लोखंडी रॅक अंगावर कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. मारुती मेश्राम (वय ६१, अर्जुनी मोरगाव, जि. गोंदिया) असे मृत कामगाराचे नाव आहे. ही घटना वीज केंद्रातील न्यू सुपरक्रिटिकल ६६० मेगावॅट संचाच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या कामादरम्यान घडली. प्राथमिक माहितीनुसार, कोराडी वीज केंद्राच्या युनिटमध्ये दुरुस्तीचे काम सुरू होते. त्यावेळी अचानक एक वजनदार लोखंडी रॅकचे स्ट्रक्चर कोसळले. ते थेट मारुती मेश्राम यांच्या अंगावर पडले आणि ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात नेले, पण उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कोराडी औष्णिक वीज प्रकल्पात गेल्या काही महिन्यांपासून वारंवार अपघात होत आहेत. याआधी मार्च महिन्यात वाफेची गळती होऊन कामगार जखमी झाले होते. तसेच, एप्रिल महिन्यात बॉयलरमधून गरम राख उडाल्याने ८ अधिकारी आणि कामगार भाजले होते. या अपघातांच्या मालिकेनंतर आता लोखंडी रॅक पडल्याने कामगाराचा जीव गेला. यामुळे कामगार संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महानिर्मितीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. अपघाताच्या कारणांची चौकशी सुरू आहे.
Source link
कोराडी वीज केंद्रात लोखंडी रॅक पडल्याने कंत्राटी कामगाराचा मृत्यू:सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर, 61 वर्षीय मारुती मेश्राम यांचा जीव गेला