![]()
मध्यवर्ती बसस्थानक व सर्किट हाऊस परिसरात रस्त्याच्या कडेला एका अनोळखी महिला गंभीर व वेदनादायक अवस्थेत दिसून आली. तिच्या पायाला मोठी जखम झाली होती आणि ती प्रचंड सुजली होती. जखमेवर माशा बसत होत्या. ही स्थिती पाहून रस्त्याने जाणारे संभाजी ब्रिगेडचे शहर सचिव ऋषभ काळे व शहराध्यक्ष देवा गावंडे यांनी मदतीचा हात पुढे केला. सुरुवातीला ऋषभ काळे यांनी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेण्याची विनंती केली. मात्र, उपचारांचा कटू अनुभव असल्याने तिने सोबत येण्यास स्पष्ट नकार दिला व हातात दगड घेऊन आरडाओरड करण्यास सुरुवात केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून काळे यांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्ष, महिला व बालविकास अधिकारी आणि मनपाच्या बेघर निवारा केंद्राला माहिती दिली. काही वेळातच सिव्हिल लाइन पोलिस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनाही न जुमानता पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या या महिलेला ऋषभ काळे यांनी अत्यंत प्रेमाने आणि विश्वासात घेऊन समजावले. “मी तुझा भाऊ आहे, सर्व उपचार करून देतो’ असा विश्वास दिल्यानंतर ती उपचारासाठी तयार झाली. महिलेला खासगी ऑटोने तत्काळ सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तिच्या जखमेवर योग्य उपचार करून मलमपट्टी केली. यानंतर महिला व बालकल्याण विभागाने तिला शासकीय वसतिगृहात राहण्याची विनंती केली, मात्र तिने सोबत येण्यास नकार दिला. सामूहिक प्रयत्नातून देण्यात आला महिलेला दिलासा या जखमी महिलेला वेळेवर वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी ऋषभ काळे व देवा गावंडे यांच्या प्रयत्नांसोबतच मनपा बेघर निवाऱ्याच्या व्यवस्थापक उषा राऊत, अमोल कांबळे, सिव्हिल लाइन पोलिस स्टेशनचे बीट मार्शल, महिला व बालविकास अधिकारी लक्ष्मण हगवणे आणि सर्वोपचार रुग्णालयातील वॉर्ड बॉय यांनी मोलाचे सहकार्य केले. या सर्वांच्या तत्परतेमुळे एका असहाय्य जिवाला दिलासा मिळाला असून शहरात माणुसकीच्या कार्याचे कौतुक होत आहे.
Source link
रस्त्यावर तडफडणाऱ्या जखमी महिलेवर उपचार:सामाजिक कार्यकर्ते, पोलिसांची सतर्कता; सर्किट हाऊस जवळील घटना