![]()
बोरगाव मंजू परिसरात यंदा खरीप हंगामाच्या सुरुवातीपासूनच निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बळीराजाला बसत आहे. मृग नक्षत्रात पावसाने ओढ दिल्याने पेरण्या लांबल्या होत्या. त्यानंतर जुलै महिन्याच्या प्रारंभी झालेल्या समाधानकारक पावसामुळे परिसरात खरीप पेरण्यांना वेग आला आणि शेतकऱ्यांनी आशेने पेरणी उरकून घेतली. बहुतांश ठिकाणी पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी, काही भागांत पुरेशी उगवण न झाल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे आर्थिक संकट ओढवले आहे. बाजारातील निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळेच अनेक ठिकाणी उगवण कमी झाल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. आधीच पेरणीचा वाढता खर्च, मशागतीचा खर्च व आता पुन्हा दुबार पेरणीच्या भुर्दंडामुळे शेतकरी अडचणी आले आहेत. त्यातच पेरणीनंतर पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने शेतकरी अधिकच हतबल झाले आहेत. सध्या काही शेतांमधील पिकांची वाढ थोड्याफार प्रमाणात समाधानकारक असून शेतकरी खुरपणी, कोळपणी, तणनियंत्रण व पिकांच्या संगोपनाच्या कामात व्यस्त आहेत. मात्र, जमिनीत अद्याप पुरेशी ओल नसल्याने व कडक ऊन तापत असल्याने पिकांच्या वाढीबाबत चिंता कायम आहे. ओल नसल्याने काही शेतांमध्ये पिके कोमेजू लागली आहेत. दुसरीकडे, ज्या शेतात पिकांना अंकुर फुटले आहेत, तेथे वन्यप्राण्यांचा हैदोस वाढल्याने पिकांचे नुकसान होत आहे. अपुरा पाऊस, बोगस बियाणे व वन्यप्राण्यांचा त्रास अशा संकटात सापडलेला शेतकरी दमदार पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. बोरगाव मंजू परिसरात काही भागात पिकांना डवरणीचा फेर देण्यात येत असून शेतकरी आंतरमशागतीच्या कामात व्यस्त दिसून येत आहेत. पावसाच्या खंडामुळे नुकतेच अंकुरलेले पीक कोमेजत आहे. निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांची अडचण निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांमुळे अनेक ठिकाणी उगवण कमी झाल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. काही शेतकऱ्यांच्या पेरण्या फसल्याने त्यांच्यावर दुबार पेरणीचे आर्थिक संकट ओढवले आहे. खरीप हंगामातील पिकांचे योग्य उत्पादन मिळण्यासाठी आगामी काळात दमदार आणि सलग पावसाची नितांत आवश्यकता असल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरा आता पावसाकडे लागल्या आहेत. वन्यप्राण्यांचा हैदोस वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त खरिपातील पिके संगोपनासह शेती कसणे शेतकऱ्यांना जिकिरीचे झाले आहे, कधी अपुरा पाऊस तर कधी नैसर्गिक संकट, योग्य बाजारपेठ उपलब्ध नाही, पीकविमा संरक्षण नाही, निकृष्ट दर्जाचे बियाणे, मशागतीसह वाढत्या खर्चामुळे शेतकरी त्रस्त आहे. त्यात खरीप पिकाला अंकुर फुटल्यावर वन्यप्राण्यांचा हैदोस वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शेतकऱ्यांना आता शेतमालाला चांगला भाव मिळणे आवश्यक आहे.
Source link
पावसाच्या खंडाचा फटका:बोरगाव मंजू परिसरात कुठे पिकांना फेर, तर कुठे दुबार पेरणीचे संकट, पुरेशी ओल नसल्याने पिकांच्या वाढीबाबत चिंता