Headlines

पंढरपुरात VIP दर्शनावरून राजकीय वाद:मुनगंटीवारांची खंत, गुलाबराव पाटलांची कबुली, नियम अधिक कडक करण्याचा प्रशासनाचा इशारा




आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य वारकऱ्यांना सुलभ दर्शन मिळावे म्हणून विठ्ठल मंदिरात 15 जुलैपासून व्हीआयपी दर्शनावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र या निर्णयाच्या पहिल्याच दिवशी मंदिरात आजी-माजी मंत्र्यांना वेगवेगळी वागणूक मिळाल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कुटुंबीयांना दर्शन नाकारण्यात आले, तर दुसरीकडे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील आपल्या सहकाऱ्यांसह थेट दर्शनासाठी गेल्याने मंदिर प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात झाली असून प्रशासनानेही नियमांची अधिक कठोर अंमलबजावणी करण्याचा इशारा दिला आहे. मुनगंटीवारांची खंत; ‘समन्वयाचा अभाव’ आषाढी वारीच्या निमित्ताने सुधीर मुनगंटीवार कुटुंबीयांसह पंढरपुरात दर्शनासाठी आले होते. मात्र मंदिर प्रशासनाने केवळ मुनगंटीवार आणि त्यांच्या पत्नीला मंदिरात प्रवेश दिला. त्यांच्यासोबत आलेल्या इतर नातेवाईकांना व्हीआयपी दर्शनासाठी प्रवेश नाकारण्यात आला. यावर प्रतिक्रिया देताना मुनगंटीवार म्हणाले की, जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः दर्शनासाठी येण्याचे निमंत्रण दिले होते. मात्र मंदिरात समन्वयाचा अभाव असल्याचे स्पष्टपणे जाणवले. आपल्याला रांगेत उभे राहण्याची कोणतीही हरकत नसली तरी प्रशासनाने एकसमान नियम लागू करावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. गुलाबराव पाटलांनी दिली कबुली दुसरीकडे राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील आपल्या सहकाऱ्यांसह थेट दर्शनासाठी गेल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. याबाबत विचारले असता त्यांनी आपल्या सोबत आलेल्या लोकांनाही दर्शनासाठी प्रवेश मिळाल्याचे मान्य केले. गुलाबराव पाटील म्हणाले, “सर्वसामान्य भाविकांना दर्शन मिळालेच पाहिजे. आम्हीही रांगेत उभे राहण्यास तयार आहोत. मात्र, मंत्री म्हणून अनेक प्रशासकीय जबाबदाऱ्या असतात. दीर्घ प्रवास करून विविध कार्यक्रमांना उपस्थित राहावे लागते. त्यामुळे काही वेळा प्रशासनालाच दर्शनाची व्यवस्था करण्याची विनंती करावी लागते.” संजय राऊत आणि वडेट्टीवार यांची टीका या प्रकरणावर शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यावर उपरोधिक टीका केली. “बहुधा त्यांना वाटत असेल की माऊलींनीच त्यांच्या पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्या पक्षात देव आणि संतही प्रवेश करतात, असा त्यांचा समज दिसतो,” असा टोला राऊत यांनी लगावला. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही व्हीआयपी दर्शनाच्या संकल्पनेवर प्रश्न उपस्थित करत, “देवाच्या दर्शनासाठी जाताना थोडा त्रास झाला तरी तो सहन करायला हवा. त्याला फटका बसला असे म्हणणे योग्य नाही,” अशी प्रतिक्रिया दिली. भाविकांची एकच मागणी – सर्वांसाठी समान नियम या संपूर्ण वादानंतर अनेक वारकरी आणि भाविकांनी व्हीआयपी दर्शन बंदीच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. आषाढी वारीच्या काळात मंत्री, आमदार, खासदार यांनीही सर्वसामान्य भाविकांप्रमाणे रांगेत उभे राहूनच दर्शन घ्यावे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली. वर्षभर व्हीआयपी दर्शनाची सुविधा मिळते, मात्र वारीच्या काळात सर्वांना समान वागणूक मिळावी, अशी मागणी भाविकांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा; नियम मोडल्यास गुन्हा दाखल होणार व्हीआयपी दर्शनाच्या वादानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी नियम अधिक स्पष्ट केले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार व्हीआयपी दर्शनावरील निर्बंधांची कठोर अंमलबजावणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, प्रोटोकॉलनुसार मंत्री, आमदार आणि खासदारांना दर्शनाची सुविधा मिळू शकते. मात्र त्यांच्या सोबत जास्तीत जास्त दोन किंवा तीन व्यक्तींनाच प्रवेश दिला जाईल. मोठा लवाजमा मंदिरात प्रवेश करू शकणार नाही. नियम मोडून व्हीआयपी दर्शनाचा प्रयत्न केल्यास आपत्कालीन कायद्यांतर्गत थेट गुन्हा दाखल केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. पहिल्या दिवशी काही प्रमाणात गोंधळ झाल्याची कबुली देत, यापुढे कोणालाही नियमांमध्ये सवलत दिली जाणार नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आजपासून विठ्ठल मंदिर 24 तास भाविकांसाठी खुले दरम्यान, आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर आजपासून विठ्ठल मंदिर 24 तास भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. परंपरेनुसार देवाचा पलंग काढण्यात आला असून विठ्ठलाच्या पाठीमागे मऊ कापसाचा लोड लावण्यात आला आहे. त्यामुळे लाखो भाविकांना सलग दर्शनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज आवसेकर आणि कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. आषाढी यात्रा संपेपर्यंत देवाचे नियमित राजोपचार स्थगित ठेवून जवळपास 22 तास 15 मिनिटे दर्शन सुरू राहणार आहे. यामुळे अधिकाधिक भाविकांना विठ्ठलाचे दर्शन घेता येणार असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले. वाखरी पुलाबाबत प्रशासनाचा खुलासा वारीपूर्वी वाखरी येथील नव्या पुलाचा भराव खचल्याची घटना समोर आल्यानंतरही प्रशासनाने खुलासा केला आहे. जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी मुख्य पुलाला कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केले. बाजूचा भराव दुरुस्त करण्याचे काम पूर्ण झाले असून पाण्याचा निचरा करण्यासाठी अतिरिक्त ड्रेनेज लाईन टाकण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. वारकऱ्यांच्या आगमनापूर्वी आवश्यक दुरुस्ती पूर्ण करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर एकीकडे विठ्ठल मंदिर 24 तास खुले करून भाविकांची सोय करण्यात आली असली, तरी व्हीआयपी दर्शनावरील वादामुळे प्रशासनाच्या अंमलबजावणीवर आणि समान नियमांच्या पालनावर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत. आगामी दिवसांत हे नियम प्रत्यक्षात किती प्रभावीपणे राबवले जातात, याकडे वारकऱ्यांसह राज्याचे लक्ष लागले आहे. हेही वाचा… जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघातातील मृतांचा आकडा वाढला:उपचारादरम्यान आणखी एका महिलेचा मृत्यू, आता बळींची संख्या 4 वर
जेजुरी येथे संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यात 13 जुलै रोजी झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा आता चारवर पोहोचला आहे. अपघातात गंभीर जखमी झालेल्या शैलजा दिनकर जगताप (वय 58, रा. कवलापूर, ता. मिरज, जि. सांगली) यांचा पुण्यातील ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापूर्वी या दुर्घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *