देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणात रोज नवे आणि अत्यंत चक्रावून टाकणारे खुलासे होत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वडगाव न्यायालयात हजर करण्यात आले
.
दरम्यान, पोलिसांच्या तांत्रिक तपासात आरोपींच्या मोबाईल डेटा आणि वेब हिस्ट्रीमधून अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली असून, पोलिसांना चकवा देण्यासाठी या दोघांनी चक्क ‘जपानी व्हिडिओ’ पाहिल्याचे उघड झाले आहे.
पोलीस चौकशीत शांत कसे राहायचे? यासाठी पाहिले जपानी व्हिडिओ!
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, १८ जून रोजी केतनची हत्या करण्यापूर्वीच सिया आणि चेतनने बचावासाठी संपूर्ण प्लॅनिंग केले होते. केतनला लोहगडावरून ढकलून देऊन हत्येला अपघाताचे रूप देण्याचा त्यांचा डाव होता. मात्र, हा अपघाताचा बनाव उघडकीस आला आणि पोलिसांनी अटक केलीच, तर पुढील चौकशीला कसे सामोरे जायचे, याची पूर्वतयारी त्यांनी केली होती.
पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलमधून डिलीट केलेल्या डेटाच्या रिकव्हरीदरम्यान काही वेब लिंक्स शोधून काढल्या आहेत. आरोपींनी गुन्ह्यापूर्वी तब्बल दोन तास चालणारे जपानी व्हिडिओ पाहिले होते. अत्यंत कसून होणाऱ्या पोलीस चौकशीत स्वतःवर ताबा कसा ठेवायचा, शांत राहून प्रश्नांची दिशाभूल करणारी उत्तरे कशी द्यायची आणि पोलिसांच्या तावडीतून कसे सुटायचे, याचे धडे या जपानी व्हिडिओच्या माध्यमातून दोघांनी गिरवले होते.
पहिला कट होता ‘स्लो पॉयझन’ देण्याचा; पण…
सिया आणि केतन यांचे लग्न ठरल्यापासूनच सियाने प्रियकर चेतनच्या मदतीने केतनचा काटा काढण्याची तयारी सुरू केली होती. केतनला हळूहळू ‘स्लो पॉयझन’ देऊन संपवायचे किंवा त्याला आयुष्यभरासाठी अपंग करायचे, असा पहिला अघोरी कट सियाने रचला होता. तिने तसा प्रयत्नही केला होता, मात्र बाजारातून किंवा इतर मार्गाने वेळेत विष उपलब्ध न झाल्यामुळे त्यांचा हा पहिला कट अपयशी ठरला. त्यानंतर त्यांनी लोहगडावरून ढकलून मारण्याचा अत्यंत क्रूर निर्णय घेतला.
राजस्थानातील खातूश्याम मंदिरात छुप्या लग्नाचा संशय
या गुन्ह्याच्या मुळाशी जाण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांचे एक पथक थेट राजस्थानमधील प्रसिद्ध खातूश्याम मंदिरात दाखल झाले आहे. सिया आणि चेतन यांच्या मोबाईल चॅटिंगच्या विश्लेषणावरून दोघेही एकमेकांशी ‘पती-पत्नी’ प्रमाणे संवाद साधत होते आणि स्वतःला लग्न झालेले समजत होते. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात सिया आणि चेतन त्यांच्या काही मित्र-मैत्रिणींसोबत राजस्थानला फिरण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी या मंदिरात भेट दिली होती. तिथे त्यांनी गुपचूप लग्न केले होते का? याचा शोध घेण्यासाठी पोलीस गेल्या तीन दिवसांपासून खातूश्याम मंदिराचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज आणि इतर पुरावे तपासत आहेत.
हे ही वाचा…
केतन हत्या प्रकरणात सिया वाचेल का?, धक्का कोणी दिला हे कसे सिद्ध होईल; पोलिसांच्या थिअरीत काय त्रुटी आहेत?

‘सिया गोयलने बॉयफ्रेंड चेतन चौधरीसोबत मिळून तिचा वाग्दत्त वर केतन अग्रवालला लोहगड किल्ल्यावरून ढकलून मारले. कारण तिला केतनशी लग्न करायचे नव्हते.’ पुणे पोलिसांची ही थिअरी संपूर्ण देशाला आठवते आहे. पण ही गोष्ट सांगायला जेवढी सोपी आहे, तेवढीच कोर्टात सिद्ध करणे कठीण आहे. सविस्तर वाचा…
केतन अग्रवाल हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट?:सिया-चेतनने 4 महिन्यांपूर्वीच गुपचूप लग्न केल्याचा दावा; व्हॉट्सॲप चॅटमधून धक्कादायक माहिती

व्यावसायिक केतन अग्रवाल हत्याप्रकरणाच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांनी चार महिन्यांपूर्वीच गुपचूप विवाह केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दोघांच्या मोबाईलमधील व्हॉट्सॲप चॅट, कॉल रेकॉर्ड, लोकेशन आणि इंटरनेट सर्च हिस्ट्रीच्या तपासातून ही बाब समोर आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे. मात्र, या कथित विवाहाबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही आणि तपास सुरू आहे. सविस्तर वाचा…