![]()
अयोध्येतील राम मंदिरात झालेल्या कथित गैरव्यवहार आणि लुटीच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने ‘रामरक्षा’ ही राज्यव्यापी चळवळ उभी केली आहे. या उपक्रमांतर्गत १८ जुलै २०२६ रोजी नागपुरात उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाचे निमंत्रण खासदार संजय राऊत यांनी काल (१५ जुलै) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्राद्वारे दिले होते. त्यानंतर आता राऊत यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनाही पत्र लिहून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे ‘विशेष निमंत्रण’ दिले आहे. या पत्रातून राऊतांनी राम मंदिरातील चोरीवरून भाजप आणि प्रशासनावर सडकून टीका केली असून, संघालाही सूचक टोला लगावला आहे. पत्राची सुरुवात आणि संघाला आठवण पत्रात राऊत म्हणतात, “अयोध्येतील राम मंदिरातील देणग्यांच्या अपहारप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘शोक’ व्यक्त केला. तरीही मंदिर चोरी प्रकरणातल्या मुख्य आरोपीवर कारवाई झालेली दिसत नाही. अयोध्येतील चोरी प्रकरणाने हिंदूंच्या श्रद्धेला व विश्वासाला तडा गेला आहे. हिंदू समाजाला पुन्हा एकदा ऊर्जा देणे गरजेचे आहे.” ‘हिंदूंना अंधभक्तीतून जागे करण्यासाठी…’ या पत्रात राऊतांनी ठाकरे गटाच्या ‘रामरक्षा’ चळवळीचा मुख्य उद्देश स्पष्ट केला आहे. “राम मंदिर चोरी प्रकरणी हिंदूंना अंधभक्तीतून जागे करण्यासाठी शिवसेनेने राज्यभरात ‘रामरक्षा’ (रामाचे संरक्षण) चळवळ सुरू केली आहे. या चळवळीचा दुसरा टप्पा नागपूर येथे होत असल्याने आपणास हे निमंत्रण देत आहोत,” असे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. ‘अंधभक्तीतून जागे करण्यासाठी’ या शब्दांचा वापर करून राऊतांनी भाजप समर्थकांवर थेट निशाणा साधला आहे. ‘स्वतः या किंवा प्रतिनिधी पाठवा’
येत्या शनिवारी, १८ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ४.३० वाजता नागपूर येथील रामनगरमधील राम मंदिरात या ‘रामरक्षा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती करताना राऊत म्हणतात, “येथे रामभक्तांना आशीर्वाद देण्यासाठी आपणास हे विशेष निमंत्रण देत आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. आपले येणे अगत्याचे आहे. काही कारणाने आपण येऊ शकला नाहीत तर आपला प्रतिनिधी पाठवा ही विनंती.” काल मुख्यमंत्र्यांना निमंत्रण काल मुख्यमंत्र्यांना आणि आज थेट सरसंघचालकांना पत्र पाठवून ठाकरे गटाने नागपूरच्या भूमीवरूनच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपला आणि संघाला घेरण्याची रणनीती आखल्याचे स्पष्ट होत आहे. राऊतांच्या या पत्रामुळे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या निमंत्रणाला काय प्रतिसाद देतो, याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. संबंधित बातमी वाचा.. रामरक्षा आंदोलनासाठी संजय राऊतांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र:रामभक्त म्हणून नागपुरातील कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे दिले निमंत्रण
अयोध्येतील राम मंदिरात होत असलेल्या कथित गैरव्यवहार आणि लुटीच्या विरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आक्रमक पवित्रा घेत ‘रामरक्षा’ हा नवा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत येत्या १८ जुलै २०२६ रोजी नागपुरात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे थेट निमंत्रण ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एका पत्राद्वारे दिले आहे. या पत्रातून राऊतांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या हिंदुत्वाची आठवण करून देत जोरदार राजकीय टोलाही लगावला आहे. सविस्तर वाचा
Source link
'हिंदूंच्या श्रद्धेला तडा गेलाय, त्यांना ऊर्जा देण्याची गरज':मोहन भागवतांना रामरक्षा आंदोनाचे निमंत्रण देत राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात