Headlines

ऍक्शन मोडवर:1925 किलो 3 लाख रु. किमतीचे प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त




शासनाच्या प्लास्टिक बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने महानगरपालिके मार्फत गुरुवारी १६ रोजी इतवारा बाजार परिसरात मोठ्या प्रमाणावर विशेष धडक कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान सुभाष प्लास्टिक (पप्पू शर्मा) तसेच हारून हाजी प्लास्टिक या आस्थापनांवर अचानक छापे टाकण्यात आले. याशिवाय सुभाष प्लास्टिक यांच्या दोन स्वतंत्र गोदामांची सखोल तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान दोन्ही आस्थापना व गोदामांमधून शासनाने प्रतिबंधित केलेल्या विविध प्रकारच्या प्रतिबंधित प्लास्टिक साहित्याचे अंदाजे बाजारमूल्य सुमारे ३ लाख इतके असून, दोन्ही आस्थापनाधारकांवर मिळून एकूण १० हजार रु. दंड आकारण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये एकल वापर प्लास्टिक, प्लास्टिक ग्लास, प्लास्टिक चमचे, तसेच शासनाने प्रतिबंधित केलेल्या विविध प्रकारच्या डिस्पोजेबल प्लास्टिक साहित्याचा मोठ्या प्रमाणात समावेश होता. सदर साहित्याचा वापर, साठवण व विक्री ही विद्यमान प्लास्टिक बंदी नियमांचे उल्लंघन असल्याने संबंधितांवर नियमानुसार जप्ती व दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्लास्टिक साहित्याचा मोठा साठा आढळून आला. या कारवाईमध्ये १९२५ किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त करण्यात आले असून ही महानगरपालिकेच्या प्लास्टिक बंदी अंमलबजावणीतील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात आहे. सदर कारवाई आयुक्त तसेच अतिरिक्त आयुक्त (२) शिल्पा नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यात आली. या विशेष मोहिमेमध्ये स्वच्छ भारत अभियान शहर समन्वयक श्वेता बोके, ज्येष्ठ स्वास्थ निरीक्षक डिक्याव, अतिक्रमण विभाग प्रमुख कोल्हे, प्लास्टिक बंदी नोडल अधिकारी गोहर, स्वास्थ निरीक्षक सचिन सैनी, इम्रान खान, दर्शन देशमुख, अनिकेत फुके, निखील खंगाळे, मेघराज डेंडवाल अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. महानगरपालिका शहरामध्ये प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर, साठवण, विक्री, वितरण व वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशाच प्रकारच्या सातत्यपूर्ण व कठोर कारवाया करण्यात येणार असून कोणत्याही प्रकारची नियमभंगाची कृती खपवून घेतली जाणार नाही. नागरिक, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, विक्रेते तसेच सर्व आस्थापनांना आवाहन करण्यात येते की, शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्लास्टिक वस्तूंचा वापर, साठा किंवा विक्री तात्काळ बंद करावी. पर्यावरणपूरक व पुनर्वापरयोग्य पर्यायांचा स्वीकार करून स्वच्छ, हरित व प्लास्टिकमुक्त अमरावती घडविण्यासाठी महानगरपालिकेस सहकार्य करावे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, व्यापारी अथवा आस्थापनांविरुद्ध भविष्यातही जप्ती, तसेच कठोर कार्यवाही करण्यात येईल, याची सर्वांनी नोंद घ्यावी. केवळ ५ हजाराच्या दंडाची तरतूद असल्याने गांभीर्यच नाही कितीही मोठा, कितीही मोठ्या रकमेचा प्लास्टिक साठा असो किंवा २०० ग्रॅमचे प्रतिबंधिक प्लास्टिक असो. दंड हा ५ हजार रुपयेच आहे. त्यामुळे यात ज्यांचे हातावर पोट आहे, अशांचे मोठे नुकसान असून जे साठवणुकीसह नियमांचे उल्लंघन करून सिंगल यूज प्लास्टिकची विक्री करीत आहेत, ते याला गुन्हाच समजेनासे झाले आहेत. दुसऱ्यांदा तोच विक्रेता जर विक्री करताना आढळला तर १० हजाराचा दंड केला जातो. तिसऱ्यांदा आढळल्यास कायदेशीर कारवाई केली जाते. त्यामुळे जोवर कठोर दंड आकारला जाणार नाही. तोवर प्लास्टिक बंदी असतानाही सिंगल युज प्लास्टिक वापरास चाप बसणार नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *