Headlines

सलग तीन दिवसांची ‎समजूत ठरली निष्फळ‎:भैताणे-दिगरमध्ये प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पाला ग्रामस्थांचा विरोध कायम




तालुक्यातील भैताणे-दिगर येथे प्रस्तावित सौर कृषी ऊर्जा प्रकल्पाविरोधात ग्रामस्थांचा संघर्ष अधिक तीव्र होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून महसूल प्रशासनाने ग्रामस्थांशी सातत्याने चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थांनी आपल्या भूमिकेत कोणतीही तडजोड न करता प्रकल्पाला ठाम विरोध कायम ठेवला आहे. “आमच्या हक्काच्या जमिनी आणि भविष्यातील पिढ्यांचे अधिकार धोक्यात घालणारा कोणताही प्रकल्प आम्हाला मान्य नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी बैठकीदरम्यान स्पष्ट केली. ग्रामस्थांच्या मते, प्रकल्पासाठी गायरान जमिनीचा वापर होणार असल्याने आदिवासी समाजाच्या पारंपरिक हक्कांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पाविरोधात ग्रामसभेत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला असून, त्यानंतरही प्रशासन जमीन संपादनाची प्रक्रिया पुढे नेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनीही ग्रामसभेच्या निर्णयाचा आदर राखण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.१४ जुलैपासून तहसीलदार रोहिदास वारुळे यांनी गावात वारंवार बैठका घेऊन ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणताही सामंजस्याचा मार्ग न निघाल्याने प्रशासनालाही अपेक्षित यश मिळाले नाही. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य राखीव पोलीस दलासह मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सलग तीन दिवस पोलीस यंत्रणा गावात तैनात असली तरी परिस्थिती शांततेत राहिली आणि ग्रामस्थांनी आपला विरोध लोकशाही मार्गाने नोंदविला. ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, प्रशासनाने प्रथम कळवण तालुक्यातील भेंडी व वाडी बुद्रुक येथील सुरू असलेल्या सौर कृषी ऊर्जा प्रकल्पांची पाहणी आणि तेथील ग्रामस्थांशी संवादाची संधी उपलब्ध करून द्यायला हवी होती. त्यानंतर स्थानिक पातळीवर वस्तुनिष्ठ चर्चा झाली असती, तर अनेक शंका दूर होण्यास मदत झाली असती. दरम्यान, भैताणे-दिगर ग्रामस्थांनी आता हा विषय थेट जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडण्याचा निर्णय घेतला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *