![]()
आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने २४ तास अखंड दर्शन व्यवस्था सुरू ठेवली आहे. मात्र, शुक्रवारी सकाळी लक्ष्मण महाराज मठाजवळील दर्शन रांगेत अचानक साप शिरल्याने काही काळ भाविकांमध्ये एकच घबराट पसरली. यानंतर सर्पमित्रांनी सापाला पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिल्याची माहिती व्यवस्थापक प्रवीण घम यांनी दिली. आषाढी यात्रेमुळे येणाऱ्या भाविकांच्या सोयी-सुविधेसाठी प्रशासन जोमाने तयारी करीत आहे. शुक्रवारी सकाळी दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांना साप दिसताच एकच धावपळ उडाली. काही क्षणांसाठी दर्शन रांग विस्कळीत झाली. घटनेची माहिती मिळताच मंदिर प्रशासनाने तत्काळ सर्पमित्रांना पाचारण केले. सर्पमित्रांनी घटनास्थळी धाव घेत सापाला सुरक्षितरीत्या पकडून सोडून दिले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. सर्पमित्र तैनात राहणार ^लक्ष्मण महाराज मठाची भिंत पडली असून त्याबाजूने साप आला. तो बिनविषारी होता. सर्पमित्रांनी पकडून निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले. मात्र खबरदारी म्हणून शहरातील सर्पमित्रांचे नाव व संपर्क क्रमांक शहरातील ठिकठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. पंढरपुरात लाखो वारकरी दाखल झाले असून, मंदिर परिसरासह दर्शन रांगांमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. याचबरोबर पत्राशेड दर्शन रांगेतील ईओसी सेंटरमध्ये काही सर्पमित्र कायमस्वरूपी थांबवण्यात येणार आहेत. प्रवीण घम, व्यवस्थापक, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती
Source link
विठूरायाच्या दर्शन रांगेत सापाची एंट्री:गोपाळपूर भाविकांची एकच धावपळ