Headlines

मनोज जरांगे पाटलांचा धनंजय मुंडेंवर घणाघात:ज्ञानेश्वर वाकडे मृत्यू प्रकरणात म्हणाले, परळीवाल्याचे गुंड मस्तावलेत; सोनम वांगचुक यांच्या उपोषणावरून केंद्रावरही हल्लाबोल




मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्यातील तसेच केंद्रातील राजकीय परिस्थितीवर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. परळी येथील ज्ञानेश्वर वाकडे मृत्यू प्रकरणी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप करत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे. दुसरीकडे, ‘नीट’ (NEET) पेपरफुटीच्या निषेधार्थ दिल्लीत सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत त्यांनी थेट केंद्र सरकार आणि पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पट्टीवडगाव येथे जाऊन मृत ज्ञानेश्वर वाकडे यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी या प्रकरणाची सविस्तर माहिती घेत स्थानिक आमदार आणि मंत्री धनंजय मुंडे तसेच पोलीस प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला. गुंडांचा सुळसुळाट “परळीवाल्याचे गुंड मस्तावले आहेत. त्यांच्यामुळे वाकडे कुटुंबीयांचे एक लेकरू गेले असून, दुसरा मुलगा लातूर येथे बेशुद्धावस्थेत उपचार घेत आहे,” असा घणाघात जरांगे यांनी केला. या प्रकरणात पीएसआय आणि पीआय 100 टक्के दोषी असल्याचा दावा त्यांनी केला. एका जखमी बांधवाला रुग्णालयात नेण्याऐवजी रात्रभर गाडीत फिरवण्यात आले. “वाकडेचा खून झाला, आता साक्षीदार राहू नये म्हणून दुसराही मारण्याचा उद्देश पोलिसांचा तर नव्हता ना?” असा संशय त्यांनी व्यक्त केला. अपघात नव्हे, खून? पोस्ट मॉर्टम रिपोर्टमध्ये हा खून असल्याचे स्पष्ट होत असतानाही परळी पोलीस याला अपघात दाखवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आरोपींवर तातडीने ‘मोक्का’ अंतर्गत कारवाई करावी, वाकडे कुटुंबीयांना पोलीस संरक्षण द्यावे आणि त्यांच्यासाठी सरकारी वकिलाची नियुक्ती करावी, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. जरांगे पाटील यांनी या प्रकरणावरून राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही लक्ष केले. “इतर नेते विकास करण्यासाठी मंत्रिपद घेतात, पण धनंजय मुंडे हे जीव घेण्यासाठी मंत्रिपद घेतात का? ते तुमचा आशीर्वाद घेऊन खून करत आहेत,” असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. फडणवीसांना सल्ला “दहा चांगले लोक सांभाळा, पण गुंड सांभाळणे बंद करा. पोलीस प्रशासन परळीवाल्याचे ऐकून खून लपवत असेल, तर ते देवेंद्र फडणवीस यांची मान खाली घालण्याचे आणि त्यांचे नाव बदनाम करण्याचे काम करत आहेत,” असा इशारा जरांगे यांनी दिला. लोक कुठवर सहन करतील? एके दिवशी मोठा उद्रेक होईल, हे फडणवीस आणि अजित पवार यांनी समजून घ्यावे आणि धनंजय मुंडेंना बळ देणे थांबवावे, असे ते म्हणाले. सोनम वांगचुकांच्या आंदोलनाला पाठिंबा; केंद्र सरकारवर हल्लाबोल ‘नीट’ (NEET) पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला आज २१ दिवस पूर्ण झाले आहेत. या आंदोलनाला जरांगे पाटील यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे. 20 दिवसांपासून उपोषण सुरू असतानाही केंद्र सरकार त्याची दखल घेत नाही. “विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले असताना सरकार एका मंत्र्याला का पाठीशी घालत आहे? देशासाठी विद्यार्थी आणि जनता महत्त्वाची नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिक्षण विभागाचा पूर्ण बोजवारा उडाला असून, विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. पंतप्रधानांनी शिक्षणमंत्र्यांना तात्काळ बडतर्फ करावे, अशी मागणी त्यांनी केली. सीजेपी (CJP) आंदोलन आणि वांगचुक यांची पार्श्वभूमी कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे आंदोलन: ‘नीट’ पेपरफुटीच्या निषेधार्थ 20 जूनपासून जंतरमंतरवर ‘सीजेपी’चे आंदोलन सुरू असून, सोनम वांगचुक यात सहभागी झाले आहेत. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांची तुलना ‘कॉकरोच’शी (झुरळ) केल्यानंतर या पक्षाची स्थापना झाल्याचे सांगण्यात येते. वांगचुकांचा तुरुंगवास: यापूर्वी लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा यासाठी वांगचुक यांनी आंदोलन केले होते. 24 सप्टेंबर 2025 रोजी लेहमध्ये उपोषणादरम्यान झालेल्या हिंसाचाराचा ठपका ठेवून त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) 170 दिवस जोधपूर तुरुंगात ठेवण्यात आले होते. या हिंसाचारात 4 जणांचा मृत्यू आणि 90 जण जखमी झाले होते. आता जंतरमंतरवरून पोलिसांनी त्यांना बळजबरीने उचलून रुग्णालयात दाखल केले आहे. वांगचूक यांचे प्राणांतिक उपोषण सुरू होते, त्यांची प्रकृतीही कमालीची खालावली होती. संबंधित बातमी वाचा… सोनम वांगचूक प्रकरणावर विरोधक आक्रमक:सरकारच्या भूमिकेवर सवाल; शरद पवार, आदित्य ठाकरेंसह नेत्यांच्या प्रतिक्रिया दिल्लीतील जंतरमंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान उपोषणाला बसलेले सोनम वांगचूक यांना दिल्ली पोलिसांनी रुग्णालयात दाखल केले आहे. सलग २१ दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावल्याने ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेनंतर आंदोलनस्थळी मोठा गोंधळ उडाला असून देशभरातून विविध राजकीय नेत्यांकडून प्रतिक्रिया उमटत आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *