Headlines

वारीच्या भक्तिमय वातावरणामध्ये वारकऱ्यांनी केला नेत्रदानाचा जागर




आषाढी वारीत भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माला समाजप्रबोधनाची जोड देत शहरात अवयवदान चळवळीबद्दल जनजागृती करण्यात आली. नेत्रदान व अवयवदानासाठी सातत्याने जनजागृती करणाऱ्या फिनिक्स सोशल फाऊंडेशन आणि अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाच्या अवयवदान समुपदेशन विभागाच्या संयुक्त विद्यमाने शहरातून मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांच्या दिंडीत नेत्रदान व अवयवदानाबाबत जनजागृती करण्यात आली. या उपक्रमाला वारकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत अवयवदानाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला. शहरातील प्रमुख मार्गांवरून जाणाऱ्या दिंडीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या हातात नेत्रदान व अवयवदानाचे महत्त्व सांगणारे जनजागृतीपर फलक व बॅनर देण्यात आले. “अवयवदान हेच श्रेष्ठ दान”, “नेत्रदानाने अंधांच्या जीवनात प्रकाश फुलवा”, “मरणोत्तर अवयवदानातून अनेकांना नवे जीवन मिळू शकते” अशा संदेशांद्वारे नागरिकांना अवयवदानासाठी प्रेरित करण्यात आले. दिंडी मार्गावरील नागरिकांनीही या उपक्रमाचे कौतुक करत अवयवदानाविषयी माहिती जाणून घेतली. अनेकांनी अवयवदानाबाबत सकारात्मक भूमिका व्यक्त केली. धार्मिक आणि सामाजिक संदेशाची सांगड घालत राबविण्यात आलेल्या या उपक्रमामुळे समाजात अवयवदानाविषयी जागरूकता निर्माण होण्यास मदत झाली. या जनजागृती मोहिमेत फिनिक्स सोशल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जालिंदर बोरुडे तसेच अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयाचे अवयवदान समुपदेशक सतीश आहिरे यांनी वारकऱ्यांसोबत सहभाग नोंदवत नागरिकांना अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *