![]()
येथील जिल्हा परिषद प्राथमिक मुलींच्या शाळेसमोरील चावळी चौकात भटक्या व मोकाट जनावरांचा दिवसेंदिवस वाढत असलेला वावर विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी गंभीर धोका ठरत आहे. शाळा सुरू होण्याच्या व सुट्टीच्या वेळेत मोठ्या संख्येने गायी, बैल व वासरे शाळेच्या प्रवेशद्वारासमोर आणि रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याने चिमुकल्या विद्यार्थिनींना जीव मुठीत धरून शाळेत ये-जा करावी लागत आहे. प्रत्यक्ष पाहणीत शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच भटक्या जनावरांनी तळ ठोकल्याचे दिसून आले. त्यामुळे विद्यार्थिनींना जनावरांच्या मधून वाट काढत शाळेत जावे लागत असून, एखादे जनावर उधळल्यास मोठी दुर्घटना घडण्याची भिती पालकांनी व्यक्त केली आहे. शाळेसमोर दुचाकी वाहने, लहान मुले आणि भटकी जनावरे एकाच ठिकाणी असल्याने अपघाताचा धोका अधिक वाढला आहे. शाळेसमोरील परिसरात जनावरांचा वावर असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून, दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे विद्यार्थिनींच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. शिक्षणाच्या मंदिरासमोरील अशी परिस्थिती पाहून पालकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या गंभीर प्रकारामुळे संतप्त झालेल्या पालकांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, तातडीने भटक्या जनावरांचा बंदोबस्त करून विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची हमी द्यावी. अन्यथा पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
Source link
मोकाट जनावरांमुळे पालक संतप्त:ग्रामपंचायत आणि स्थानिक लोकप्रतिनिधींविरोधात पसरली नाराजी