![]()
कॉकरोज जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाच्या समर्थनार्थ सोमवारी मुंबईत ठिकठिकाणी करण्यात आलेल्या आक्रमक आंदोलनांप्रकरणी मुंबई पोलिसांनी अत्यंत कडक पाऊल उचलले आहे. शहरात परवानगी न घेता आंदोलन करणे आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचा ठपका ठेवत पोलिसांनी विविध पोलिस ठाण्यांमध्ये एकूण ८ गुन्हे दाखल केले आहेत. या कारवाईत तब्बल ९०० हून अधिक आंदोलकांना आरोपी करण्यात आले असून, पोलिसांकडून पुढील कायदेशीर प्रक्रियेचा वेग वाढवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य मुंबईतील वेगवेगळ्या भागात झालेल्या या आंदोलनांप्रकरणी संबंधित पोलिस ठाण्यांत स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये शिवाजी पार्क पोलिस ठाण्याच्या हद्दीत आंदोलकांचा सर्वाधिक भरणा असल्याने तिथे सर्वाधिक कारवाई करण्यात आली आहे. चैत्यभूमीवरील विनापरवाना आंदोलनावर ३ गुन्हे दादर येथील ऐतिहासिक चैत्यभूमी परिसरात सीजेपीच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या आंदोलनाची पोलिसांनी गंभीर दखल घेतली आहे. या आंदोलनासाठी पोलिस प्रशासनाकडून कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. संवेदनशील ठिकाणी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून आंदोलन केल्याप्रकरणी दादर पोलिसांनी चैत्यभूमी परिसरातील घटनेबाबत ३ स्वतंत्र गुन्हे दाखल केले असून ५० हून अधिक आंदोलकांना यामध्ये नामांकित करण्यात आले आहे. कायदेशीर कारवाई वेगाने सुरू “शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची परवानगी न घेता आणि सार्वजनिक वाहतुकीला अडथळा निर्माण करून आंदोलन करणाऱ्यांवर ही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत दाखल झालेल्या एफआयआरनुसार आंदोलकांची ओळख पटवून त्यांच्यावर कायदेशीर चौकशीची प्रक्रिया सुरू आहे,” अशी माहिती मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
Source link
CJP च्या मुंबईतील आंदोलनावर कारवाईचा बडगा:कायदा-सुव्यवस्थेचा भंग केल्याप्रकरणी 900 हून अधिक जणांवर FIR; 8 पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल