![]()
प्रस्तावित महाराष्ट्र खासगी कोचिंग केंद्रे नोंदणी व नियमन कायदा अंतिम करण्यापूर्वी राज्य सरकारने संबंधित घटकांशी योग्य चर्चा करावी, अशी मागणी प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन ऑफ महाराष्ट्रने (पीटीएएम) मंगळवारी केली. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने याचिकाकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेण्याचे आदेश दिले आहेत. याचा दाखला देत, सरकारने कायदा करण्यापूर्वी पीटीएएमशी औपचारिक चर्चा करावी, अशी मागणी संघटनेने केली. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत पीटीएएमचे अध्यक्ष डॉ. प्रशांत कुलकर्णी यांनी संघटनेची भूमिका सांगितली. ते म्हणाले, “आमचा नियमांना विरोध नाही; मात्र अनावश्यक, असमान आणि एकतर्फी नियमांना विरोध आहे.” यावेळी सचिव डॉ. नितीन कदम, माजी अध्यक्ष विजय पवार, माजी सचिव हनुमंत भोसले, कार्याध्यक्ष प्रल्हाद दौंड आणि पुणे कोअर कमिटीचे सदस्य दुर्गेश मंगेशकर हजर होते. पीटीएएमने एप्रिल 2025 मध्ये दाखल केलेल्या रिट याचिकेचा (क्रमांक 3447/2025) निकाल देताना उच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, सरकारने कायदा करण्यापूर्वी याचिकाकर्त्यांशी चर्चा करून त्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे. म्हणणे स्वीकारले नाही तर त्याची कारणेही याचिकाकर्त्यांना कळवावीत, असे आदेशात सांगितले असल्याचा दावा संघटनेने केला. प्रस्तावित कायद्यातील 25 विद्यार्थ्यांची नोंदणी मर्यादा वाढवून 100 पेक्षा अधिक करावी, अशी मुख्य मागणी पीटीएएमने केली आहे. तसेच 13 वर्षांखालील मुलांना कोचिंग देण्यावरील पूर्ण बंदी हटवावी, अशी मागणी आहे. मूलभूत कौशल्ये, उपचारात्मक शिक्षण, ऑलिम्पियाड आणि शिष्यवृत्ती परीक्षांच्या तयारीसाठी अशा वर्गांची गरज असल्याचे संघटनेने म्हटले आहे. कोचिंग संस्थांवरील ‘निरीक्षक राज’ आणि ‘परवाना राज’ला विरोध करताना तपासणीचे स्पष्ट नियम, आधी सूचना, संस्थेला बाजू मांडण्याची संधी, टप्प्याटप्प्याने दंड आणि पारदर्शक अपील व्यवस्था असावी, अशी मागणी करण्यात आली. पीटीएएमने ‘कोचिंग क्लासेस स्वयंनियमन परिषद’ स्थापन करण्याचा प्रस्तावही दिला आहे. सरकार, शिक्षण विभाग, कोचिंग संस्था, पालक, विद्यार्थी, कायदेतज्ज्ञ तसेच अग्निसुरक्षा व डिजिटल शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचा त्यात समावेश असावा, असे सुचवले आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास 11 सप्टेंबरला राज्यातील कोचिंग क्लासेसचा एकदिवसीय बंद पुकारण्याचा इशारा संघटनेने दिला आहे. हा बंद विद्यार्थी आणि पालकांच्या विरोधात नसून प्रस्तावित कायद्याबाबतची लोकशाही पद्धतीने मांडलेली चिंता असल्याचे पीटीएएमने स्पष्ट केले.
Source link
कोचिंग क्लासेसच्या नियमांवरून सरकारला इशारा:कोचिंग क्लासेसच्या नियमांवरून पीटीएएम आक्रमक; 11 सप्टेंबरला राज्यव्यापी बंदचा इशारा