Headlines

मिरवणुका, पथनाट्य, स्वरांजली, व्याख्यानाने दणाणला इर्विन चौक:डाॅ. बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी अनुयायांची रिघ‎




महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंगळवारी, १४ एप्रिलला येथील इर्विन चौक अक्षरश: दणाणून गेला. सोमवारच्या मध्यरात्रीपासूनच येथे मिरवणुका, पथनाट्य, स्वरांजली आणि महापुरुषांच्या जयघोषाचा गजर सुरू होता. दिवसभरात अनुयायांसह नागरिकांनी डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याचरणी नतमस्तक होऊन महामानवाला अभिवादन केले. गेल्या १५ वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा सौंदर्यीकरण समितीतर्फे येथे मुख्य सोहळ्याचे आयोजन केले जाते. त्यानुसार सकाळच्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार, विचारवंत, लेखक संजय आवटे यांचे सर्वांना अंतर्मुख करणारे व्याख्यान झाले.याशिवाय दिवसभर शहराच्या वेगवेगळ्या भागातून छोट्या-मोठ्या मिरवणुका याठिकाणी पोहोचत होत्या. गीत-संगीताची अविरत चालणारी आदरांजली, शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचारधन असलेली ग्रंथसंपदा आणि महापुरुषांच्या तसबीरी व मूर्तींचा खजीना हे आज या चौकाचे वैभव ठरले. सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरवही या वेळी करण्यात आला. अध्यक्षस्थानी खासदार बळवंतराव वानखडे होते. तर अतिथी म्हणून राज्यसभा सदस्य डॉ. अनिल बोंडे, आमदारव्दय सुलभाताई व संजय खोडके, माजी पालकमंत्री हर्षवर्धन देशमुख, डॉ. सुनील देशमुख व ॲड. यशोमती ठाकूर, ज्येष्ठ पत्रकार ॲड. दिलीप एडतकर, प्राचार्य गोपीचंद मेश्राम, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय पदाधिकारी भय्या पवार, श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष गजानन पुंडकर आणि जिल्हाधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते. स्मारक समितीचे समन्वयक किशोर बोरकर यांनी प्रास्ताविक केले. संचालन प्रा. डॉ. जगदीश गोवर्धन यांनी केले. राष्ट्रगीताने समारोप झाला. ‘भूमिका ओळखा,नाहीतर पिढी माफ करणार नाही’ : या वेळी बोलताना ज्येष्ठ व्याख्याते-पत्रकार संजय आवटे यांनी प्रत्येकाला बोलतं करण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले, आपापली जबाबदारी ओळखून प्रत्येकाने व्यक्त व्हायला पाहिजे. सध्याचे युग हे डीजीटल युग आहे, त्यामुळे तुम्ही जे काही करता आहात, ती माहिती अगदी कायम सांभाळून ठेवता येते. ही माहिती जेव्हा आताची पिढी वयात आल्यानंतर बघेल, तेव्हा त्यांना तुमच्याबद्दल वाईट वाटण्याऐवजी तुमचा अभिमान वाटेल, अशी परिस्थिती निर्माण करा. नाहीतर राज्यकर्ते जेव्हा नोकरी, रोजगार, अभिव्यक्ती अशा माझ्या साऱ्याच स्वातंत्र्याची नाकाबंदी करीत होते. नद्या, पर्वत, शासकीय उपक्रम विकत होते, तेव्हा तुम्ही काय करीत होते, असा प्रश्न ही पिढी विचारेल. खासकरुन महिलांनाही त्यांनी अंतर्मुख केले. अत्यंत ओघवत्या शैलीत तासाभराच्या मांडणीत ते म्हणाले, गेल्या निवडणुकांमध्ये तुम्हीच घोळ केला आहे. पंधराशे खात्यात आले, म्हणून तुम्ही आनंदी झालात, परंतु त्याचवेळी तुमच्या मुलं आणि नातवंडांच्या खात्यात छदामही नाही, याचा तुम्हाला विसर पडला. पण माझा तुमच्यावर भरवसा आहे. जसा घोळ केला, तसा तो निस्तारा. फुले, शाहू, आंबेडकर यांनी तुमच्यासाठी जे-जे केले, ते आठवा. खरं म्हणजे त्यांच्यामुळेच तुम्ही आज इथवर आला आहात, तेव्हा त्यांच्या विचाराची कास धरणारी माणसं राज्यकर्ती बनवा, असे ते म्हणाले. ग्रंथसंपदा, सेल्फी पॉइंट, मूर्ती अन् पुस्तकांची विक्री याठिकाणी शिव, शाहू, फुले,डॉ. आंबेडकर यांची पुस्तकेही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होती. वाचनप्रिय नागरिकांनी ती विकत घेतली. काहींनी डॉ. आंबेडकर आणि भगवान भगवान बुद्ध यांच्या मूर्तींना पसंती दर्शवली. तर काहींनी दुपट्टे, कि चेन आणि इतर साहित्याची खरेदी करुन आनंद द्विगुणीत केला. दिवसभर सुरू असलेल्या स्वरांजलीच्या ठिकाणीही मोठी गर्दी जमली होती. या गर्दीला पाणी आणि नाश्ता पुरवण्याचे कामही एसबीआय, तथागत फाउंडेशन, युवक काँग्रेस अशा संस्थांनी केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *