![]()
जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धबधबे, घाटमाथा, गडकिल्ले आणि इतर पर्यटनस्थळांवर दुर्घटना घडण्याची शक्यता लक्षात घेऊन हे उपाय योजण्यात आले आहेत. या अधिसूचनेनुसार, जुन्नर तालुक्यातील आंबोली धबधबा (दऱ्याघाट), माळशेज घाट, कांचन धबधबा (हातवीज), रिव्हर्स वॉटरफॉल (नाणेघाट), किल्ले शिवनेरी, चावंड, जिवधन, हडसर, निमगिरी, आहुपे, डिंभे धरण, पोखरी घाट यासह आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर आणि कोंढवळ धबधबा या पर्यटनस्थळांवर हे आदेश लागू आहेत. या आदेशांनुसार, वेगाने वाहणाऱ्या पाण्यात उतरणे किंवा पोहणे, धबधब्याखाली जाणे, धोकादायक ठिकाणी सेल्फी किंवा चित्रीकरण करणे, मद्यपान करून किंवा मद्य बाळगून पर्यटनस्थळी प्रवेश करणे, धोकादायक ठिकाणी वाहने उभी करणे, बेदरकार वाहन चालवणे, सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे, महिलांची छेडछाड करणे, मोठ्या आवाजात ध्वनीक्षेपक, डीजे किंवा वाहनांवरील स्पीकर वाजवणे, तसेच ध्वनी, वायू आणि जलप्रदूषण होईल अशा कृती करण्यास सक्त मनाई आहे. याव्यतिरिक्त, धबधबे, धरणे आणि नदी परिसरातील सर्व प्रकारच्या दुचाकी, चारचाकी व इतर वाहनांच्या प्रवेशावरही निर्बंध घालण्यात आले आहेत. प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना या आदेशांचे काटेकोर पालन करून स्वतःची व इतरांची सुरक्षितता जपण्याचे आवाहन केले आहे. आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ आणि इतर लागू कायद्यांनुसार कारवाई केली जाईल, असे अधिसूचनेत स्पष्ट केले आहे. दरम्यान, अतिवृष्टीमुळे जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यांमधील एकूण १३ रस्ते तात्पुरत्या स्वरूपात वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. नद्या-नाल्यांवरील पुलांवरून पाणी वाहत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रांताधिकारी अर्चना तांबे यांनी हा आदेश जारी केला आहे. सततच्या पावसामुळे धरणांतील पाणीसाठ्यात वाढ झाली असून, धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदी, ओढे आणि बंधाऱ्यांवरील अनेक पुलांवरून पाणी वाहत आहे. या परिस्थितीत वाहतूक सुरू ठेवल्यास अपघात होण्याची शक्यता असल्याने हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे. जुन्नर तालुक्यातील बंद करण्यात आलेल्या रस्त्यांमध्ये जुन्नर–बेळेआळी ते लेण्याद्री पूल, बस्ती–सावरगाव पूल, निमगाव–निमदरी पूल, जुन्नर–वडज पूल, नारायणगाव–वारुळवाडी (नेवकर) पूल, नारायणगाव–वारुळवाडी (मेहेर) पूल, खोडद–रांजणी पूल आणि हिवरे तर्फे नारायणगाव येथील बंधाऱ्यावरील पुलाचा समावेश आहे. आंबेगाव तालुक्यात लाखणगाव येथील घोडनदीवरील पूल (बेल्हा–जेजुरी महामार्ग), भराडी येथील बंधारा रस्ता, डिंभे–बोरघर रस्ता, डिंभे–भीमाशंकर रस्ता तसेच अडिवरे–अहुपे रस्ता हे मार्ग बंद आहेत.
Source link
जुन्नर-आंबेगावमध्ये अतिवृष्टी; पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक आदेश लागू:धबधबे, गडकिल्ले, घाटमाथ्यावर जाण्यास मनाई; 13 रस्तेही बंद