![]()
पुणे ग्रामीणमधील खेडशिवापूर पोलिस चौकीत पैशांची फेकाफेक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका व्यावसायिकाकडील एक कोटी रुपयांची रोकड लुटण्याच्या प्रयत्नाचे धागेदोरे या चौकीपर्यंत पोहोचले आहेत. या घटनेत पोलिस कर्मचाऱ्यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त होत असून, पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांनी सविस्तर अहवाल मागवला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी व्यावसायिकाला चौकीत आणल्यानंतर तेथील एका पोलिस कर्मचाऱ्याने बॅगेतील काही पैसे कथित तोतया पत्रकाराकडे फेकले. मात्र, प्रकरण अंगलट येण्याची शक्यता दिसताच हे पैसे पुन्हा बॅगेत ठेवण्यात आले. या गोंधळात एका व्यक्तीचा पाय फ्रॅक्चर झाल्याचेही समजते. हा कथित पत्रकार खेडशिवापूर चौकीतील एका महिला पोलिस अंमलदाराच्या ओळखीचा असल्याचा दावा केला जात आहे. मूळ घटना पुणे शहर पोलिस आयुक्तालयाच्या नऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. असे असतानाही आरोपींनी व्यावसायिकाला खेडशिवापूर चौकीत नेल्यामुळे चौकीतील एखादा कर्मचारी या कटात आधीपासून सहभागी होता का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तोतया पत्रकार आणि पोलिसांच्या लागेबांधाचा संशय बळावला आहे. या प्रकाराची माहिती मिळताच पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल यांनी राजगड पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी संतोष जाधव यांच्याकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. जाधव यांनी अहवाल सादर केला असून, त्याची छाननी केल्यानंतर चौकीत नेमके काय घडले, हे स्पष्ट होईल, असे गिल यांनी सांगितले. ही घटना सिंहगड रस्त्यावर शनिवारी (दि. 18) दुपारी दोनच्या सुमारास घडली होती. व्यावसायिक हर्षवर्धन पवार आणि त्यांचे सहकारी किरण आपटे हे विक्रम चाकणकरच्या कारमधून नऱ्हे येथील बँकेकडे जात असताना, दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांची कार अडवली. आरोपींनी स्वतःला पोलिस असल्याचे सांगून कारमधील ‘दोन नंबरचा माल’ असल्याचे म्हटले आणि एक कोटी रुपये असलेल्या दोन बॅगा हिसकावण्याचा प्रयत्न केला. पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रतिकार केल्यामुळे आरोपींचा डाव फसला. या प्रकरणी विक्रम चाकणकर, अमेय कार्ले आणि गणेश कदम यांना अटक करण्यात आली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू असून, ‘परदेशी’ नावाच्या व्यक्तीची भूमिकाही तपासली जात आहे. पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी कथित तोतया पत्रकाराला ताब्यात घेऊन चौकशी करण्याचे आदेश नऱ्हे पोलिसांना दिले आहेत.
Source link
खेडशिवापूर पोलिस चौकीत पैशांची फेकाफेक:1 कोटींच्या लुटमारीचे धागेदोरे पोलिसांपर्यंत; पोलिस अधीक्षकांनी मागवला अहवाल