![]()
अंजनगाव बारी ते कोंडेश्वर या महत्त्वाच्या रस्त्याच्या नूतनीकरणाचे काम रखडल्याने नागरिक, भाविक आणि वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या या रस्त्यावर चिखल व गाळ मोठ्या प्रमाणात साचला आहे. यामुळे प्रवास करणे, विशेषतः दुचाकीस्वारांसाठी अत्यंत कठीण झाले आहे. येत्या काही दिवसांत श्रावण महिना सुरू होणार असल्याने कोंडेश्वर देवस्थानात येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढेल, ज्यामुळे त्यांना दर्शनासाठी बिकट मार्गातून जावे लागेल. या रस्त्यासाठी सन २०१८ मध्ये सुमारे २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर २०२६ मध्ये १ कोटी रुपयांच्या सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले. मात्र, भूमिपूजनाला चार महिने उलटूनही हे काम पूर्णत्वास गेलेले नाही. सध्या केवळ ५०० मीटर सिमेंट रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे, नव्याने तयार करण्यात आलेल्या या ५०० मीटर रस्त्यावर काही दिवसांतच भेगा पडल्याचे दिसून आले आहे. यामुळे कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. संबंधित विभागाने या प्रकरणाची चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. उर्वरित मार्गाचे काम पूर्णपणे रखडले आहे. पावसाळ्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचला असून, वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे दुचाकीस्वारांना अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. शेतकरी, शालेय विद्यार्थी आणि परिसरातील ग्रामस्थांनाही रोजच्या प्रवासात त्रास सहन करावा लागत आहे. कोंडेश्वर हे परिसरातील प्रसिद्ध धार्मिक व पर्यटनस्थळ असल्याने येथे वर्षभर भाविकांची मोठी वर्दळ असते. विशेषतः श्रावण महिन्यात आणि सुट्टीच्या दिवशी मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. रस्त्याच्या या दुरवस्थेमुळे भाविकांनाही मनस्ताप सहन करावा लागत आहे. प्रशासन आणि संबंधित विभागाने या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन रखडलेले काम पूर्ण करावे, भेगा पडलेल्या रस्त्याच्या गुणवत्तेची चौकशी करावी आणि संपूर्ण मार्गाचे दर्जेदार डांबरीकरण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
Source link
अंजनगाव बारी-कोंडेश्वर रस्ता चिखलाने भरला, प्रवास बिकट:२५ कोटींच्या निधीनंतरही काम रखडले, श्रावणात भाविकांना अडचण