![]()
नागपूरच्या जलालपुरा परिसरात कर्करोगाला कंटाळून ५२ वर्षीय आई अमया अनंता कानखोजे आणि त्यांचा ३३ वर्षांचा मुलगा अद्वैत कानखोजे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. अमया या रेल्वेत अनुकंपा तत्त्वावर कार्यरत होत्या आणि त्या ब्रेस्ट कॅन्सरने ग्रस्त होत्या, तर त्यांचा मुलगा अद्वैत हा गंभीर आजारपणामुळे शय्याग्रस्त होता. जलालपुरा येथील श्री गुरु माउली अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या कानखोजे कुटुंबाचा शेजाऱ्यांशी फारसा संपर्क नव्हता. अमया यांचा दुसरा मुलगा यश हा हैदराबाद येथे राहतो. मंगळवारी यशने आईला वारंवार फोन केला, मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. काहीतरी अनुचित घडल्याची शंका आल्याने यशने नागपुरातील परिचित व्यक्ती आणि स्थानिक नगरसेवकांशी संपर्क साधून घरात जाऊन पाहण्याची विनंती केली. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केले. घराच्या मुख्य चॅनेल गेटला बाहेरून कुलूप होते आणि मागचे दार आतून बंद होते. पोलिसांच्या उपस्थितीत गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश केला असता, दोघे माय-लेक मृतावस्थेत आढळून आले आणि जवळच विषाची बाटली सापडली. कोतवाली पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. घटनास्थळावरून पोलिसांना एक सुसाइड नोट हस्तगत झाली आहे. आजारपणाला कंटाळूनच आपण हे टोकाचे पाऊल उचलत असून या घटनेसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असा उल्लेख यामध्ये आहे. कोतवाली पोलिस तपास करत आहेत.
Source link
नागपुरात आजाराला कंटाळून माय-लेकाने केली आत्महत्या:'आम्हा दोघांच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये, सुसाइड नोटमधये उल्लेख