Headlines

सामाजिक दायित्वातून तिसगावी पाणंद रस्ता दुरूस्त:300 ते 400 शेतकऱ्यांच्या दैनंदिन वापराचा मुख्य मार्ग माेकळा, विद्यार्थ्यांची अडचण दूर‎




तालुक्यातील तिसगाव येथील महत्त्वाचा असलेला गांगुर्डे व खैरे वस्तीकडे जाणारा पाणंद रस्ता अखेर सामाजिक दायित्वातून दुरुस्त करण्यात आला आहे. हा रस्ता प्रवासासाठी मोकळा झाल्याने शेतकऱ्यांसह भाविक, शाळकरी मुले व नागरीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जुना तिसगाव-चांदवड रस्ता हा परिसरातील सुमारे ३०० ते ४०० शेतकऱ्यांच्या दैनंदिन वापराचा मुख्य मार्ग आहे. या रस्त्याचा सुरुवातीचा आणि शेवटचा भाग शेतकऱ्यांनी यापूर्वी स्वतःच्या खर्चातून दुरुस्त केला होता. मात्र, रस्त्याचा मधला पाणंद भाग अत्यंत खराब आणि भीतीदायक झाला होता. पावसाळ्यात या भागात पाणी साचत असल्याने त्याची नालेसफाई करून रस्ता दुरुस्त करण्याची मागणी वस्तीवरील नागरिकांकडून सातत्याने होत होती. याच वस्तीवर प्रसिद्ध श्री हृदयेश्वर भगवान महादेव मंदिर आहे. महाशिवरात्री सप्ताहासह दरमहा होणाऱ्या प्रदोष निमित्ताने येथे भाविकांची मोठी गर्दी असते. खराब रस्त्यामुळे भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. शाळेत जाणाऱ्या लहान मुलांनाही या चिखलमय आणि झाडीझुडपांच्या रस्त्यावरून ये-जा करताना भीती वाटत होती. शेतकऱ्यांनी ही समस्या अ‍ॅड. भूषण गांगुर्डे आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशोक गांगुर्डे यांच्याकडे मांडली होती. नागरिकांची अडचण ओळखून अ‍ॅड. भूषण गांगुर्डे यांनी सामाजिक दातृत्वातून एका दानशूर व्यक्तीच्या माध्यमातून मोफत जेसीबी मशीन उपलब्ध करून दिले. रस्त्याचे सपाटीकरण आणि नालेसफाईचे काम पूर्ण करण्यात आले. रस्ता दुरुस्तीचे काम करून घेताना तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष अशोक गांगुर्डे, लक्ष्मण गांगुर्डे, शिवाजी गांगुर्डे, केशव खैरे, अशोक गांगुर्डे, आदींसह शेतकरी उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *