Headlines

विद्यार्थ्यांना अमानुषपणे झालेली मारहाण ही हुकूमशाही- बाळासाहेब थोरात‎:दिल्लीतील लाठी हल्ल्याचे संगमनेरात तीव्र पडसाद; शहरामध्ये मशाल मोर्चा




दिल्ली येथे विद्यार्थ्यांना झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात हजारो संगमनेरकर आज रस्त्यावर उतरले. या घटनेचा तीव्र निषेध करत पंतप्रधान, गृहमंत्री व शिक्षणमंत्री यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी मागणी करताना हजारो युवक विद्यार्थी महिला व नागरिकांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करून संगमनेर दणाणून सोडले. याचवेळी आंदोलन दडपण्याचा प्रयत्न म्हणजे हुकूमशाही असल्याची टीका काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केली देश वाचवण्यासाठी तरुणांनी पुन्हा एकदा संघर्ष करण्याची तयारी ठेवा असे आवाहन त्यांनी केले आहे. शहरात समविचारी पक्षांच्यावतीने विराट मशाल मोर्चा आयोजित करण्यात आला. संगमनेर बसस्थानक ते महात्मा फुले स्मारक इथपर्यंत झालेल्या या रस्त्यामध्ये शहरातील व तालुक्यातील हजारो नागरिक रस्त्यावर उतरले यावेळी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, दुर्गाताई तांबे, जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, वंचित बहुजन आघाडीचे आजीज ओरा, शिवसेनेचे अमोल बोराडे, तालुकाध्यक्ष अजय फटांगरे, सोमेश्वर दिवटे कार्याध्यक्ष यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. थोरात म्हणाले, सोनम वांगचूक यांचे २१ दिवसापासून जंतर-मंतरवर उपोषण सुरू आहे. त्यांचा आवाज हा सर्वसामान्य विद्यार्थ्यांचा आणि युवकांचा आवाज आहे. परंतु केंद्र सरकारला तो ऐकू येत नाही. केंद्र सरकारला सत्तेचा गर्व झाला आहे. हुकूमशाही पद्धतीने लाठी हल्ला करून अमानुषपणे विद्यार्थ्यांचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न त्यांनी केला. संसदेमध्ये काँग्रेस नेत्यांना बोलू दिले नाही म्हणून खासदार राहुल गांधी व प्रियंका गांधी यांनी पंतप्रधानांच्या घरासमोर आंदोलन केले. अत्यंत अमानुषपणे त्यांची उचलबांगडी करण्यात आली. त्यांची धरपकड करण्यात आली. देशात लोकशाही संपुष्टात आणण्याचे काम सरकार करत आहे. माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले, नीट पेपर फुटी हा मोठा भ्रष्टाचार आहे. केंद्र सरकार आणि मंत्र्यांमध्ये कोणतीही नैतिकता उरली नाही. तातडीने धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला होतो आहे. विद्यार्थी जखमी होत आहेत आणि पंतप्रधान एक शब्दही बोलत नाहीत. हे अत्यंत दुर्दैवी आहे. यावेळी अमोल बोराडे, छात्रभारतीचे तुषार पावसे, ॲड. रंजना गवांदे, अनुराधा आहेर, अजित ओरा, यांच्यासह विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी काँग्रेस, शहर काँग्रेस, युवा काँग्रेस, एकविरा फाउंडेशन, जय हिंद लोक चळवळ, वंचित बहुजन आघाडी, छात्र भारती, एनएसयुआय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आरपीआय, कम्युनिस्ट, अंधश्रद्धा निर्मूलन, सत्यशोधक समाज व विविध पुरोगामी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. हजारो नागरिक रस्त्यावर जंतरमंतर वरील आंदोलनाला पाठिंबा देत व विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात आज समविचारी सर्व पक्ष एकत्र आले. संगमनेर शहर व तालुक्यातील हजारो नागरिक महिला युवक रस्त्यावर येऊन केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. संगमनेर शहरातून झालेला विराट मशाल मोर्चा हा मोठा लक्षवेधी ठरला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *