![]()
नीट पेपरफुटी प्रकरणाविरोधातील विद्यार्थी आंदोलनादरम्यान दादरमध्ये घडलेल्या एका घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आंदोलकांना ताब्यात घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनासमोर एका तरुणीने उभे राहत वाहन अडवण्याचा प्रयत्न केल्याचा दावा करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी ‘एक्स’वर शेअर करत मुंबईची हिंमत अशी प्रतिक्रिया दिली आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये संबंधित तरुणी पोलीस वाहनासमोर काही काळ उभी राहिल्याचे दिसत आहे. त्यानंतर आणखी काही आंदोलक तिच्यासोबत आल्याचेही व्हिडिओमध्ये दिसते. काही सोशल मीडिया पोस्टमध्ये या घटनेनंतर ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सोडण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या दाव्याबाबत मुंबई पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती किंवा स्वतंत्र निवेदन जारी केलेले नाही. दादरमधील विद्यार्थी आंदोलनादरम्यान परिसरात काही काळ मोठी वाहतूक कोंडी झाली होती. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलिसांनी काही आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवले. आपल्या सहकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे पाहताच एका तरुणीने थेट पोलीस व्हॅनसमोर उभे राहत वाहन अडवण्याचा प्रयत्न केला. ती काही काळ घोषणाबाजी करत व्हॅनसमोर ठामपणे उभी राहिली. त्यावेळी तिच्या समर्थनार्थ इतर काही तरुणही पुढे आले आणि त्यांनीही घोषणाबाजी केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तेथे उपस्थित असलेल्या आंदोलकांनी चित्रित केला. हा व्हिडिओ नंतर विविध सोशल मीडिया खात्यावरून शेअर करण्यात आला. त्यानंतर तो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, अनेक नेटकऱ्यांनी त्यावर समर्थन, टीका आणि विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. विद्यार्थी आंदोलनादरम्यान घडली घटना नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आणि देशभर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बुधवारी दादर आणि चेंबूर परिसरात मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली. विद्यार्थी आणि युवक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलकांनी परीक्षा व्यवस्थेतील कथित त्रुटींवर प्रश्न उपस्थित करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क, सेना भवन, वीर सावरकर मार्ग आणि परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन अनेक ठिकाणी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. काही आंदोलकांनी पोलिसांनी त्यांना घराबाहेर पडू दिले नाही किंवा मेट्रो स्थानकांवर अडवून चौकशी केली, असा आरोप केला आहे. या आरोपांवर पोलिसांकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. पोलिसांचा दावा; 1,500 जणांची गर्दी, 200 जण ताब्यात मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, सार्वजनिक आंदोलनासाठी परवानगी नसतानाही शिवाजी पार्क परिसरात सुमारे 1,500 आंदोलक जमा झाले होते. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी कारवाई करत सुमारे 200 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती विभागीय पोलीस उपायुक्त (झोन 5) महेंद्र पंडित यांनी दिली. दरम्यान, दादरमधील या तरुणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत असून, त्यावर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. मात्र, व्हिडिओतील सर्व दावे आणि ताब्यात घेतलेल्या आंदोलकांना सोडल्याच्या दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही. हेही वाचा… वंचित बहुजन आघाडीचा आज ‘महाराष्ट्र बंद’:कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा, जबरदस्ती केल्यास कारवाईचा इशारा नवी दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज्यभरात, विशेषतः मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंददरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच जबरदस्तीने दुकाने किंवा व्यवहार बंद पाडले जाऊ नयेत, यासाठी पोलिसांनी ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत. शांतता भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. सविस्तर वाचा जंतर-मंतरवर पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष:CJP समर्थकांनी दगडफेक केली, ACP जखमी; पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे फेकले; 16 मेट्रो स्टेशन बंद दिल्लीतील जंतर-मंतरजवळ बुधवारी रात्री 8:30 च्या सुमारास विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, कनॉट प्लेस येथील टॉल्स्टॉय मार्गाजवळ काही उपद्रवींनी पोलिसांवर दगड आणि बाटल्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एसीपी कनॉट प्लेस विवेक भगत जखमी झाले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे फेकले. घटनेशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले. ज्यात आंदोलकांच्या हातात लाठ्याही दिसत आहेत. ते पोलिसांवर हल्ला करत आहेत. ही झटापट सुमारे 15 मिनिटे चालली. त्यानंतर परिस्थिती सामान्य आहे. सविस्तर वाचा
Source link
मुंबईची हिंमत!:आंदोलकांनी भरलेली पोलीस व्हॅन अडवणाऱ्या तरुणीचा व्हिडिओ व्हायरल, संजय राऊतांनी केली पोस्ट