![]()
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान काल पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतल्याचा आरोप करत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या नेत्यांशी पोलिसांनी गैरवर्तन केल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी लोकशाही नव्हे तर हुकूमशाही असल्याचे म्हटले. तसेच, काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपने केलेल्या आंदोलनाचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला असून, या प्रकाराला ‘चोरांच्या उलट्या बोंबा’ असे म्हटले आहे. याचबरोबर, ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी आधी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घ्या आणि मगच कारवाई करा, असे थेट आव्हान त्यांनी पंतप्रधान मोदींना दिले आहे. पोलिसांची दादागिरी; गाडीत ढकल्याने खांद्याला दुखापत काँग्रेसच्या वतीने काल काढण्यात आलेल्या शांततापूर्ण मोर्चादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईवर वडेट्टीवार यांनी सडकून टीका केली. ते म्हणाले, “काल पोलिसांनी आमच्यावर जबरदस्ती केली. आम्ही अत्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन आणि मार्च करत होतो. मात्र, पोलिसांनी आम्हाला जबरदस्तीने ताब्यात घेतले. त्यांनी मला ज्या पद्धतीने उचलले आणि गाडीत ढकलले, ती पोलिसांची दादागिरी आणि गुंडगिरीच होती.” या झटापटीमुळे रात्री आपल्या खांद्याला प्रचंड त्रास होत असल्याचेही त्यांनी सांगितले. “ही वागणूक देण्याची पद्धत नाही. अशा हुकूमशाही पद्धतीने सरकार चालवून तुम्हाला कुणाचाही आवाज दाबता येणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला. ‘चोरांच्या उलट्या बोंबा’; भाजपला सुनावले खडेबोल भाजपने काल काँग्रेस कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनावरून वडेट्टीवारांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपला थोडी तरी लाज वाटायला हवी, अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली. “नीट परीक्षेचा पेपर तुम्ही फोडला आणि आता तुम्हीच आंदोलन करत आहात. एरवी पोलिस चोरांच्या मागे धावतात, पण इथे चोरच पोलिसांच्या मागे धावत आहेत, असा हा प्रकार आहे. काल आम्ही या चोरांच्या उलट्या बोंबा पाहिल्या,” असा घणाघात त्यांनी केला. तरुणांचा आक्रोश आणि संताप दाबून टाकण्यासाठीच भाजपकडून हे सर्व प्रकार केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मोदींना प्रत्युत्तर: आधी राजीनामा, मग कारवाई नीट पेपरफुटी प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या भूमिकेवरही वडेट्टीवार यांनी थेट निशाणा साधला. केवळ घोषणा करून किंवा कारवाईचे आश्वासन देऊन प्रश्न सुटणार नाही, असे ते म्हणाले. “पंतप्रधानांनी आधी नैतिकतेच्या आधारे या संपूर्ण प्रकरणाची जबाबदारी निश्चित करून आधी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे. राजीनामा घेतल्यानंतरच पुढच्या कारवाईबद्दल बोलावे,” अशी भूमिका विजय वडेट्टीवार यांनी मांडली आहे. हेही वाचा.. फास्ट ट्रॅक कोर्टचे स्वागत, पण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा कधी?:पंतप्रधान मोदींच्या घोषणेनंतर रोहित पवारांचा सवाल दिल्लीतील जंतरमंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मोठी घोषणा केली. पेपरफुटी प्रकरणातील दोषींना तातडीने शिक्षा देण्यासाठी ‘फास्ट ट्रॅक कोर्ट’ स्थापन करण्यात येतील, असे पंतप्रधानांनी जाहीर केले. त्यांच्या या भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी आभार मानत स्वागत केले आहे. मात्र, त्याचवेळी त्यांनी थेट सरन्यायाधीशांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, केवळ ट्विट करून चालणार नाही तर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, अशी आक्रमक मागणी केली आहे. सविस्तर वाचा वंचित बहुजन आघाडीचा आज ‘महाराष्ट्र बंद’:कार्यकर्त्यांना पोलिसांच्या नोटिसा, जबरदस्ती केल्यास कारवाईचा इशारा नवी दिल्लीतील आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेल्या कारवाईच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी राज्यभरात, विशेषतः मुंबईत पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंददरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये तसेच जबरदस्तीने दुकाने किंवा व्यवहार बंद पाडले जाऊ नयेत, यासाठी पोलिसांनी ‘वंचित’च्या कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्या आहेत. शांतता भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे. सविस्तर वाचा जंतर-मंतरवर पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष:CJP समर्थकांनी दगडफेक केली, ACP जखमी; पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे फेकले; 16 मेट्रो स्टेशन बंद दिल्लीतील जंतर-मंतरजवळ बुधवारी रात्री 8:30 च्या सुमारास विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, कनॉट प्लेस येथील टॉल्स्टॉय मार्गाजवळ काही उपद्रवींनी पोलिसांवर दगड आणि बाटल्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात एसीपी कनॉट प्लेस विवेक भगत जखमी झाले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी अश्रुधुराचे गोळे फेकले. घटनेशी संबंधित काही व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आले. ज्यात आंदोलकांच्या हातात लाठ्याही दिसत आहेत. ते पोलिसांवर हल्ला करत आहेत. ही झटापट सुमारे 15 मिनिटे चालली. त्यानंतर परिस्थिती सामान्य आहे. सविस्तर वाचा
Source link
विजय वडेट्टीवारांचा भाजपवर घणाघात:म्हणाले- चोरांच्या उलट्या बोंबा! नीट पेपर तुम्ही फोडला अन् आंदोलनही तुम्हीच करता?