Headlines

विद्यार्थी आंदोलनात देशविरोधी घोषणा का?:देशहिताच्या गोष्टी राहुल गांधींच्या तोंडी शोभत नाहीत, त्यांनी आपल्या उंचीनुसार बोलावले – नीतेश राणे




राज्याचे मंत्री नीतेश राणे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधत, “देशहिताच्या आणि तरुणांच्या हिताच्या गोष्टी राहुल गांधींच्या तोंडी शोभत नाहीत,” अशी टीका केली. नीट परीक्षा आणि त्यावरील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी काँग्रेससह विरोधकांवर आरोप करत केंद्र सरकार परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी पावले उचलत असल्याचा दावा केला. ‘देशाच्या भविष्यासाठी पंतप्रधान कटिबद्ध’ नीतेश राणे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील तरुणांचे भविष्य सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले आहे. “देशाच्या भविष्यासाठीच जनतेने नरेंद्र मोदींना पंतप्रधान केले आहे. त्यांनी केलेले ट्विट योग्य असून प्रत्येक तरुणाने त्या संदेशाचा बोध घ्यावा,” असे ते म्हणाले. ‘NEETमध्ये सुधारणा व्हायलाच हव्यात’ राणे म्हणाले की, “नीट परीक्षेत सुधारणा व्हाव्यात, याबाबत केंद्र सरकार आणि संबंधित मंत्री सकारात्मक आहेत. त्यादृष्टीने पावलेही उचलली जात आहेत. नुकताच नीटचा निकाल लागला असून सुमारे 11 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.” मात्र, आंदोलनाच्या नावाखाली काही जण देशविरोधी घोषणा देत असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘आंदोलनात देशविरोधी घोषणा का?’ राणे म्हणाले, “नीटच्या प्रश्नावर आंदोलन होत असताना देशविरोधी घोषणा का दिल्या जात आहेत? हिंदू धर्माचा अपमान का केला जात आहे? सैन्यावर आणि पोलिसांवर टीका का केली जाते? हे करणारे खरे विद्यार्थी असू शकत नाहीत.” त्यांच्या मते, देशविरोधी विचारांच्या काही शक्ती आंदोलनात घुसून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची बदनामी करण्याचा प्रयत्न करत आहेत. ‘राहुल गांधींनी आपल्या राजकीय उंचीनुसार बोलावे’ राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या टीकेलाही राणे यांनी प्रत्युत्तर दिले. “देशहिताच्या आणि तरुणांच्या हिताच्या गोष्टी राहुल गांधींच्या तोंडी अजिबात शोभत नाहीत. म्हणूनच जनतेने त्यांना आणि काँग्रेसला वारंवार घरी बसवले आहे. राहुल गांधींनी आपल्या राजकीय उंचीनुसार आदरणीय नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलावे,” असा टोला त्यांनी लगावला. ‘काँग्रेसच्या काळात किती पेपरफुटी झाल्या?’ काँग्रेसवर टीका करताना राणे म्हणाले, “काँग्रेसच्या सत्ताकाळात किती वेळा परीक्षा पेपर फुटले? त्या वेळी किती पंतप्रधान किंवा शिक्षणमंत्र्यांचे राजीनामे घेतले? आधी त्याचा हिशेब द्यावा आणि नंतर भाजपवर टीका करावी. आम्ही किमान परीक्षा व्यवस्थेत सुधारणा करण्याची मानसिकता ठेवतो.” ‘आंदोलनाच्या नावाखाली देशविरोधी भूमिका मान्य नाही’ अण्णा हजारे यांच्या मौन आंदोलन आणि विविध आंदोलनांबाबत बोलताना नीतेश राणे म्हणाले, “लोकशाहीत प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र आंदोलनाच्या खांद्यावर बसून देशविरोधी भूमिका घेणे, देवी-देवतांचा अपमान करणे किंवा समाजात तेढ निर्माण करणे हे देशहिताचे नाही.” ‘बंदला जनतेनेच उत्तर दिले’ वंचित बहुजन आघाडीने दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेबाबत विचारले असता नीतेश राणे म्हणाले, “बंदला जनतेने काय प्रतिसाद दिला, हे कॅमेऱ्यातून स्पष्ट दिसले. देशाची जनता नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवते. म्हणूनच त्यांनी सलग तीन वेळा त्यांना सत्तेत आणले आहे.” ‘विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत तडजोड होणार नाही’ नीतेश राणे यांनी सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे की, नीट परीक्षेत झालेल्या त्रुटी दूर करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. देशातील कोणत्याही विद्यार्थ्याचे भविष्य खराब होऊ दिले जाणार नाही. मात्र नीट आंदोलनाच्या नावाखाली देशविरोधी आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या शक्तींना प्रोत्साहन दिले जाणार नाही.”



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *