![]()
राज्यात काही दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनने पुन्हा एकदा रौद्र रूप धारण केले आहे. हवामान विभागाने पुणे, नाशिक आणि कोकणातील जिल्ह्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड आणि ऑरेंज अलर्ट) दिला आहे. नाशिकमध्ये गोदावरी नदीला पूर आला असून अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर दुसरीकडे, शेजारील गुजरात राज्यातही पावसाने ‘मेघतांडव’ सुरू केले असून, तिथे पुरात अडकलेल्या महाराष्ट्रातील ३५ पर्यटकांची हेलिकॉप्टरच्या मदतीने सुखरूप सुटका करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, पश्चिम भारतापासून ते दक्षिण कोरियापर्यंत तब्बल १० हजार किलोमीटर लांबीचे ढग पसरले असून, या ‘क्लाऊड कॉरिडॉर’मुळेच हा जोरदार पाऊस होत असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. राज्यात पावसाचा जोर वाढला; धरणांमधून विसर्ग सुरू जून महिन्यात ओढ दिलेल्या पावसाने जुलैमध्ये जोरदार पुनरागमन केले आहे. हवामान विभागाने पुण्याच्या घाटमाथ्यासाठी ‘रेड अलर्ट’ तर नाशिक, ठाणे, पालघर, रायगडसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. सततच्या पावसामुळे धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. खडकवासला धरण १०० टक्के भरल्यामुळे त्यातून ९,४०५ क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. विशेष म्हणजे, २३ जुलैपर्यंत महाराष्ट्रात महिन्याच्या सरासरीपेक्षा ३४ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. मात्र, हा पाऊस प्रामुख्याने कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात असून, मराठवाड्याला अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे. कल्याणमध्ये मुसळधार पावसाचा कहर; अंडरपासमध्ये कार वाहून गेली, चालकाची सुटका
कल्याणमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वाळधुनी परिसरातील अंडरपास पाण्याखाली गेला. या दरम्यान एका कारचालकाचा ताबा सुटून ती विठ्ठलवाडी नाल्यात वाहून गेली. अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावकार्य राबवत चालकाची सुखरूप सुटका केली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून, पाण्याने भरलेल्या रस्त्यांवरून प्रवास करताना नागरिकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नाशिकमध्ये पूरस्थिती; अनेक गावांचे स्थलांतर त्र्यंबकेश्वर (२९९ मिमी) आणि नाशिक (१३० मिमी) येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. गंगापूर धरण ९७ टक्के भरल्याने पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. पुराचे पाणी निफाड तालुक्यातील सायखेडा आणि चांदूर गावात शिरल्याने तेथील सुमारे ६५ कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. गोदाघाटावरील प्रसिद्ध दुतोंड्या मारुती ९० टक्के पाण्याखाली (डोक्यापर्यंत) गेला आहे. हे पाणी आता जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावत आहे. गुजरातमध्ये ‘मेघतांडव’; मराठवाड्यातील पर्यटकांचे रेस्क्यू गुजरातच्या वलसाड आणि उमरगाव परिसरात अवघ्या ४५ तासांत १२७० मिमी पाऊस झाल्याने भयानक स्थिती निर्माण झाली आहे. नद्यांना पूर आल्याने डहाणू ते वलसाड रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. याच वलसाडमध्ये खासगी बसने गेलेले मराठवाड्यातील (जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी) ३५ पर्यटक पुरात अडकले होते. सुदैवाने, गुजरात प्रशासनाने तातडीने हेलिकॉप्टर पाठवून या सर्व पर्यटकांची सुखरूप सुटका केली. गुजरातमध्ये आतापर्यंत २२ हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. महाबळेश्वर आणि मुंबई पावसाच्या टॉप शहरांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात (१ जून ते २३ जुलै या ५३ दिवसांत) देशभरात सर्वाधिक पाऊस मेघालयातील चेरापुंजी (३६११.४ मिमी) येथे झाला आहे. मात्र, त्याखालोखाल महाराष्ट्रातील महाबळेश्वर (३२७५ मिमी) देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच, देशातील सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या टॉप ५ शहरांमध्ये मुंबई (१५०१.६ मिमी) चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. आशियावर १० हजार किमीचा ढग (क्लाऊड कॉरिडॉर) सध्या होत असलेल्या या अतिवृष्टीमागे एक मोठे भौगोलिक कारण समोर आले आहे. उपग्रहाच्या छायाचित्रानुसार, पश्चिम भारतापासून ते थेट दक्षिण कोरियापर्यंत तब्बल १० हजार किलोमीटर लांबीचे पावसाळी ढग पसरले आहेत. हवामान तज्ज्ञांनी याला ‘क्लाऊड कॉरिडॉर’ असे नाव दिले असून, हा ढग ज्या भागावर दाटला आहे, तिथे मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढील दोन दिवस पावसाची ही तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. हेही वाचा.. यूपीत गंगा, यमुनासह 10 नद्यांना पूर:गुजरातच्या अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका; बिहारच्या 19 जिल्ह्यांना पावसाचा इशारा संपूर्ण देशात मान्सूनचा पाऊस सुरू आहे. दक्षिण गुजरातमधील मुसळधार पावसामुळे अनेक जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. उमरगाम तालुक्यात 16 तासांत 43 इंच पाऊस झाला. त्यामुळे सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. शुक्रवारी राज्याच्या 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. यूपीमध्ये गेल्या 10 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गंगा, यमुना यासह 10 नद्या दुथडी भरून वाहत आहेत. शुक्रवारी 54 जिल्ह्यांमध्ये पावसाचा अलर्ट आहे. आसाममध्ये पुरामुळे 6.53 लाख लोक प्रभावित झाले आहेत. सविस्तर वाचा
Source link
राज्यात पावसाचा जोर वाढला:घाटमाथ्यावर रेड अलर्ट, नाशिक-पालघरमध्ये पूरस्थिती; अनेक गावांचा संपर्क तुटला