Headlines

पेपरफुटी ठाकरेंच्या काळात उघडकीस आली:सुषमा अंधारेंनी फडणवीसांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले




शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुणे येथे पत्रकार परिषदेत बोलताना, राज्यातील सर्वात मोठा परीक्षा पेपर घोटाळा उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात झाला नसून, तत्कालीन सरकारने तो उघडकीस आणला, असा दावा केला. त्यांनी या प्रकरणातील आरोपी आणि तपास अधिकाऱ्यांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. अंधारे यांनी सांगितले की, म्हाडाच्या परीक्षेपूर्वी पोलिसांना पेपरफुटीची माहिती मिळाल्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली होती. तपासात जी. ए. सॉफ्टवेअर कंपनीचा मालक प्रितीश देशमुख पेपर वाटताना रंगेहाथ सापडला. कर्नाटक सरकारने या कंपनीवर बंदी घातली असतानाही, विनोद तावडे शिक्षणमंत्री असताना तिला परीक्षेचे कंत्राट मिळाल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाच्या तपासात सुरुवातीला १४, त्यानंतर ४७ एजंटांची माहिती समोर आली. तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर आणि तत्कालीन परीक्षा परिषद आयुक्त तुकाराम सुपे यांची नावेही तपासात निष्पन्न झाली, असे अंधारे यांनी नमूद केले. सुमारे १५ हजार जागांसाठी सव्वापाच लाख विद्यार्थी परीक्षा देणार होते आणि सुमारे साडेसात हजार विद्यार्थ्यांनी फुटलेला पेपर घेतल्याचा दावाही त्यांनी केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तपास यंत्रणांना पूर्ण स्वातंत्र्य दिल्यामुळे ही साखळी उघड झाली, असे अंधारे म्हणाल्या. मात्र, तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी भाग्यश्री नवटके यांना नंतर बाजूची नियुक्ती देण्यात आली आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला. नवटके यांना ठाकरे सरकारप्रमाणे मुक्तपणे तपास करण्याची संधी देणार का, असा सवाल त्यांनी फडणवीसांना केला. याच पत्रकार परिषदेत अंधारे यांनी नीट आंदोलनातील कथित विनयभंग प्रकरणावरूनही सरकारला लक्ष्य केले. संबंधित व्यक्ती पोलीस नसेल, तर आंदोलनाच्या ठिकाणी तो पोहोचलाच कसा, असा प्रश्न उपस्थित करत, सांगळे यांच्या निलंबनाचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *