Headlines

पार्थ पवार यांचा विवाह 27 फेब्रुवारी 2027 रोजी:बारामती येथे होणार; शंकराचार्यांकडून धार्मिक विधींबाबत मार्गदर्शन




खासदार पार्थ अजित पवार यांचा विवाह 27 फेब्रुवारी 2027 रोजी बारामती येथे होणार आहे. त्यांचा साखरपुडा 29 जुलै 2026 रोजी मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उमेश पाटील यांनी दिली आहे. पार्थ पवार यांच्या नियोजित वधूचे अधिकृत नाव कायनात दारा असून, त्या मूळच्या चंदीगड येथील आणि सध्या दिल्लीमध्ये वास्तव्यास आहेत. आई किंवा वडिलांच्या निधनानंतर कुटुंबातील विवाह एका वर्षाच्या आत करावा लागतो; अन्यथा पुढील तीन वर्षे विवाह करता येत नाही, असा एक समज समाजात प्रचलित आहे. या पार्श्वभूमीवर धार्मिक प्रथा आणि धर्मशास्त्रातील तरतुदी जाणून घेण्यासाठी उमेश पाटील यांनी करवीर पीठाच्या शंकराचार्यांची भेट घेतली. यावेळी पार्थ पवार यांच्या विवाहाची तारीख आणि ठिकाण याबाबतही शंकराचार्यांना माहिती देण्यात आली. छत्रपती शाहू महाराज आणि करवीर शंकराचार्य पीठाचे ऐतिहासिक संबंध लक्षात घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. पालकांच्या निधनानंतर धर्मशास्त्रात सांगितलेले सर्व विधी आणि धार्मिक संस्कार नियमानुसार पूर्ण करणे आवश्यक आहे. मात्र, संबंधित कुटुंबातील विवाह एका वर्षाच्या आतच झाला पाहिजे, असे कोणतेही धार्मिक बंधन नसल्याचे शंकराचार्यांनी स्पष्ट केले. यामुळे यासंदर्भात समाजात कोणताही गैरसमज राहू नये, असे आवाहन उमेश पाटील यांनी केले आहे. दरम्यान, पार्थ पवार यांच्या नियोजित वधूचे नाव, त्याचा उच्चार, स्पेलिंग, जन्मस्थळ तसेच सामाजिक पार्श्वभूमीबाबत काही वृत्तपत्रे, डिजिटल माध्यमे आणि सोशल मीडिया मंचांवर चुकीची माहिती प्रसारित झाल्याचा दावा करण्यात आला आहे. कायनात दारा या पंजाबी हिंदू समाजातील असून त्यांचे गोत्र कश्यप आहे. त्यांनी नवी दिल्लीतील द ब्रिटिश स्कूलमधून शालेय शिक्षण, तर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून आंतरराष्ट्रीय संबंध विषयात पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी ‘एनडीटीव्ही 24×7’मध्ये रिपोर्टर आणि आउटपुट एडिटर म्हणूनही काम केले आहे. सध्या त्या कुटुंबाच्या हॉस्पिटॅलिटी आणि रिअल इस्टेट व्यवसायात कार्यरत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *