Headlines

सततच्या ॲसिडिटीकडे दुर्लक्ष करताय?:वारंवार पोटदुखी, अपचन आणि पोट फुगणे ही लक्षणे अंगावर काढू नका; वेळीच निदान महत्त्वाचे




वारंवार पोटदुखी, पोट फुगणे, अपचन किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर पोटाच्या उजव्या वरच्या भागात वेदना होणे, ही केवळ अॅसिडिटीची लक्षणे नसून पित्ताशयातील खड्यांची (गॉलस्टोन्स) असू शकतात. तज्ज्ञांनी याकडे वेळीच लक्ष देण्याचा आणि निदान व उपचार करण्याचा सल्ला दिला आहे. लठ्ठपणा, असंतुलित आहार, बैठी जीवनशैली, मधुमेह, झपाट्याने वजन कमी होणे आणि वाढते वय यामुळे गॉलस्टोन्सचा धोका वाढतो. त्यामुळे या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे आरोग्यासाठी गंभीर ठरू शकते. पुण्यातील जनरल सर्जन डॉ. नितीन भावे यांनी याविषयी माहिती दिली. त्यांच्या मते, पित्ताशयात कोलेस्ट्रॉल, पित्तद्रव्ये आणि कॅल्शियमपासून खडे तयार होतात. सुरुवातीला अनेक रुग्णांना कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत. मात्र खड्यांमुळे पित्तवाहिनीत अडथळा निर्माण झाल्यास किंवा पित्ताशयाला सूज आल्यास तीव्र पोटदुखी, मळमळ, उलट्या, अपचन आणि जेवल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसू शकतात. या वेदना पाठीत किंवा उजव्या खांद्यापर्यंतही जाऊ शकतात. डॉ. भावे यांच्या निरीक्षणानुसार, पित्ताशयातील खडे असलेल्या सुमारे ५० टक्के रुग्णांकडून सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष केले जाते. दर महिन्याला ३० ते ७० वयोगटातील जवळपास ५० टक्के रुग्ण वारंवार पोटदुखी, पोट फुगणे आणि अपचनाच्या तक्रारी घेऊन उपचारासाठी येतात. उपचारात विलंब झाल्यास पित्ताशयाला सूज, संसर्ग, कावीळ, पित्तवाहिनीत अडथळा किंवा स्वादुपिंडाला सूज (पॅन्क्रियाटायटिस) यांसारख्या गंभीर गुंतागुंती उद्भवू शकतात.गॉलस्टोन्सचे निदान करण्यासाठी अल्ट्रासाऊंड ही सर्वात प्रभावी प्राथमिक तपासणी आहे. लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी लॅप्रोस्कोपिक पद्धतीने पित्ताशय काढण्याची शस्त्रक्रिया हा प्रभावी उपचार मानला जातो. गॉलस्टोन्सचा धोका कमी करण्यासाठी काही उपाययोजनाही सुचवल्या आहेत. यामध्ये वजन नियंत्रणात ठेवणे, संतुलित व तंतुमय आहार घेणे, तेलकट पदार्थांचे अतिसेवन टाळणे, नियमित व्यायाम करणे आणि मधुमेह नियंत्रणात ठेवणे यांचा समावेश आहे असे त्यांनी सांगितले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *