![]()
बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांच्या मृत्यूप्रकरणात आपल्यावरील आरोप निराधार असल्याचा दावा माजी आमदार आणि शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. त्यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली. संबंधित बांधकाम प्रकल्पातील आर्थिक व्यवहारांशी आपला थेट संबंध नसल्याचे स्पष्ट करत, पोलिसांच्या चौकशीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचे धंगेकर यांनी सांगितले. पुण्यातील गुलटेकडी येथील रहिवासी खलील शेख यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक व्हिडिओ तयार केला होता. त्यात त्यांनी आर्थिक अडचणी आणि काही व्यक्तींवर आरोप केले होते. शेख यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीनंतर स्वारगेट पोलिसांनी रवींद्र धंगेकर, त्यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर आणि इतर काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. धंगेकर यांनी सांगितले की, संबंधित जागेवर पुनर्विकास प्रकल्प राबवण्यासाठी ‘उत्कर्ष असोसिएट्स’ची स्थापना करण्यात आली होती. या प्रकल्पाला रेरा (RERA) मान्यता मिळाली होती आणि बँकेनेही कर्ज मंजूर केले होते. मात्र, जागा वक्फ बोर्डाशी संबंधित असल्याची नोटीस मिळाल्यानंतर बांधकाम थांबले. यामुळे प्रकल्प रखडला, आर्थिक नुकसान झाले आणि कर्जाचा बोजा वाढला, असा दावा त्यांनी केला. राजकीय दबावामुळेच प्रकल्प अडचणीत आल्याचा आरोपही धंगेकर यांनी केला. रवींद्र धंगेकर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची पत्नी प्रतिभा धंगेकर यांनी २०२५ मध्येच या प्रकल्पातील भागीदारी सोडली होती. खलील शेख यांचे पैसे जाणीवपूर्वक रोखल्याचा आरोप चुकीचा असून, कथित चिठ्ठीमध्ये आपले नाव नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाचे राजकारण न करता पोलिसांनी उपलब्ध व्हिडिओ, कागदपत्रे आणि आर्थिक व्यवहारांची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी धंगेकर यांनी केली. तपासानंतर सत्य जनतेसमोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Source link
खलील शेख मृत्यू प्रकरणी धंगेकरांनी आरोप फेटाळले:निष्पक्ष चौकशीची मागणी करत आर्थिक व्यवहारांशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले