Headlines

‘कृषी वनीकरणा’तून शेतकऱ्यांचे उत्पन्न, अन्नसुरक्षेची निश्चिती:डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 5 एकरात साकारतेय 5 कृषी वनीकरण मॉडेल्स‎




कृषी वनीकरणाचा दीर्घ २५ ते ३० वर्षांचा प्रदीर्घ अनुभव पणाला लावत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील वनविज्ञान विभागातील प्रा. हर्षवर्धन देशमुख यांनी कुलगुरू डॉ. शरद गडाख, डॉ. एस. एस. हरणे, सहयोगी अधिष्ठाता डी. एम. पंचभाई, संशोधन संचालक एस. एस. माने यांच्या मार्गदर्शनात अल्पभूधारक व लहान शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी प्रकल्प साकारला जात आहे. विद्यापीठाच्या परिसरात पाच एकरांवर हा प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पास सामाजिक वनीकरण विभागाचे अनुदान आहे. ऑगस्टमध्ये यात झाडांची लागवड केली जाणार आहे. यात प्रत्येक एकरासाठी एक याप्रमाणे एकूण पाच अनोखे कृषी वनीकरण मॉडेल्स विकसित केली आहेत. शेतकऱ्यांना वर्षभर नियमित उत्पन्न मिळावे, त्यांची अन्नसुरक्षा अबाधित राहावी व भविष्यात मोठा आर्थिक परतावा मिळावा, हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. हे मॉडेल प्रामुख्याने अल्पभूधारक शेतकरी कुटुंबाच्या दैनंदिन गरजा डोळ्यांसमोर ठेवून तयार केले आहे. यात जमीन व जागेच्या पुरेपूर वापरासाठी चार स्तरांवर (कॅनोपी) लागवड केली जाते. सर्वात वरच्या स्तरात साग, त्याखाली आंबा, आवळा, जांभूळ व फणस आदी फळझाडे लावतात. जमिनीवर पारंपरिक कृषी पिके व जमिनीखाली हळदीसारखे पीक घेतले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना उन्हाळ्यात आंबा फळांतून मिळणाऱ्या पैशांचा वापर पावसाळ्यापूर्वी पेरणी व बियाणे खरेदीसाठी करता येईल. नैसर्गिकरीत्या दुर्मिळ होत चाललेल्या व व्यावसायिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या स्थानिक प्रजातींचे संवर्धन या मॉडेलमध्ये केले जाईल. यात हिरडा, मोह, चारोळी आणि निंब आदी झाडांची लागवड करून शेतकऱ्यांना व्यावसायिक उत्पन्न मिळवून देण्यासह बिघडलेला पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होणार आहे. हा शेतकऱ्यांसाठी एक प्रकारचा ‘दीर्घकालीन आर्थिक बोनस’ ठरणार आहे. यात साग (१५-२० वर्षे), महोगनी (१०-१२ वर्षे), मेलियाडुबिया (८-१० वर्षे) आणि रक्तचंदन (२५ वर्षे) आदी मौल्यवान झाडांची लागवड केली जाईल, यामुळे शेतकऱ्यांना भविष्यात मोठा आर्थिक परतावा मिळेल. दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी व दुभत्या जनावरांच्या चाऱ्याची समस्या सोडवण्यासाठी हे मॉडेल डिझाइन केले आहे. यात तुती, वड, पिंपळ, अंजन, शेवरी आदी चारा देणारी झाडे व चारा पिके एकत्र लावली जातील. यात प्रथमच ‘कट अँड कॅरी’ (झाड अर्ध्या फुटावरून कापणे व पुन्हा येणारे नवीन फुटवे चाऱ्यासाठी वापरणे) या पद्धतीचा प्रयोग होणार आहे.कागद निर्मिती उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची गरज पूर्ण करण्यासाठी या मॉडेलमध्ये सरू आणि बांबूची लागवड केली जाणार आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *