Headlines

लातूरमधून अल्पवयीन मुलीचे अपहरण करून चिपळूणमध्ये अत्याचार:उदगीर पोलिसांनी 24 तासांत लावला छडा, 'पोक्सो'अंतर्गत कठोर कारवाई




लातूर जिल्ह्यातील उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला प्रेमाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची आणि रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यातील एका गावात डांबून ठेवून तिच्यावर अत्याचार केल्याची अत्यंत संतापजनक घटना समोर आली आहे. या गंभीर प्रकरणाची तातडीने दखल घेत उदगीर ग्रामीण पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवली आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत अवघ्या 24 तासांत या गुन्ह्याचा छडा लावला. या जलद कारवाईत पोलिसांनी पीडित मुलीची सुरक्षित सुटका केली असून, या नराधम मुख्य आरोपीसह गुन्ह्यात त्याला मदत करणाऱ्या सहआरोपीलाही बेड्या ठोकल्या आहेत. उदगीर तालुक्यातील लोणी गावातून एक अल्पवयीन मुलगी अचानक बेपत्ता झाल्यानंतर, सर्वत्र शोध घेऊनही ती न सापडल्याने हतबल झालेल्या तिच्या नातेवाईकांनी उदगीर ग्रामीण पोलिस ठाण्यात धाव घेतली. घटनेचे गांभीर्य आणि मुलीचे वय लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून, या संपूर्ण संतापजनक प्रकरणातील धडक कारवाईची माहिती उदगीर ग्रामीणचे पोलिस निरीक्षक गाडे यांनी दिली. पोलिस निरीक्षक गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने वेगाने सूत्रे हलवत संशयितांच्या मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण सुरू केले. ‘मोबाईल लोकेशन’चा अचूक माग काढताना पोलिसांना अशी धक्कादायक माहिती मिळाली की, पीडित मुलगी लातूरपासून शेकडो किलोमीटर दूर रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात आहे. मुख्य आरोपीला मदत करणारा सहआरोपी गणेश बसुराज फड याचा एक मित्र चिपळूणच्या ग्रामीण भागात राहात असून, त्याच्याच घरात या पीडित मुलीला डांबून ठेवण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. उदगीर पोलिसांनी 24 तासांत मुलीची केली सुटका उदगीर पोलिसांनी स्थानिक यंत्रणेच्या मदतीने तातडीने छापा टाकून अवघ्या 24 तासांत पीडित मुलीची सुटका केली आणि दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांच्या संरक्षणात आल्यानंतर मुलीने रत्नागिरीत तिच्यावर झालेल्या अत्याचाराची आपबिती कथन केल्याने, या प्रकरणात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत (POCSO) अत्यंत कडक कलमे वाढवण्यात आली आहेत. या गुन्ह्याखाली (नोंद क्र. 487/2026) मुख्य आरोपी कृष्णा अच्युत फड (18) आणि त्याला मदत करणारा सहआरोपी गणेश बसुराज फड (20) यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. तसेच चिपळूणमधील त्या स्थानिक मित्राच्या भूमिकेसह पोलिस आता या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *