![]()
पुण्यातील खराडी परिसरात एका बिर्याणी हाऊसमध्ये १४ वर्षांखालील दोन अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतल्याप्रकरणी हॉटेल मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खराडी पोलिसांनी बालमजुरी प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमांन्वये ही कारवाई केली आहे. बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याने ग्लोबल प्रिसियस रोडवरील लताई कॉम्प्लेक्सजवळील बिर्याणी हाऊसमध्ये अल्पवयीन मुलांकडून काम करून घेतले जात असल्याची माहिती खराडी पोलिसांना दिली होती. या माहितीच्या आधारे सहायक पोलिस निरीक्षक विजय वंजारी यांच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला. त्यावेळी दोन्ही अल्पवयीन मुले हॉटेलमध्ये काम करताना आढळून आली आहे. पोलिसांच्या चौकशीदरम्यान, या मुलांनी गेल्या सुमारे १२ दिवसांपासून हॉटेलमध्ये काम करत असल्याचे सांगितले. त्यांना दरमहा पाच हजार रुपये वेतन दिले जात होते आणि त्यांची राहण्याची व्यवस्था देखील हॉटेलमध्येच करण्यात आली होती. तपासात दोघांचेही वय १४ वर्षांपेक्षा कमी असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणात हॉटेल चालकाची ओळख अतीकुर रहमान खान (वय ४३) अशी झाली आहे. तो मूळचा उत्तर प्रदेशातील श्रावस्ती जिल्ह्याचा रहिवासी असून, सध्या खराडी येथील संबंधित बिर्याणी हाऊस चालवत आहे. आरोपीने अल्पवयीन मुलांकडून कमी वेतनावर अधिक काम करून त्यांचे आर्थिक, मानसिक व शारीरिक शोषण केल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. खराडी पोलिसांनी आरोपीविरुद्ध बाल व किशोर कामगार (प्रतिषेध व नियमन) अधिनियम, किशोर न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
Source link
बिर्याणी हाऊसमध्ये दोन अल्पवयीन मुलांकडून काम:मालकाविरुद्ध बालमजुरी कायद्यान्वये गुन्हा दाखल