Headlines

यशासाठी शिस्त, जिद्द आणि सातत्य महत्त्वाचे:ऑलिम्पिक पदक विजेती बॅडमिंटनपटू सायना नेहवालने साधला विद्यार्थ्यांशी संवाद




ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान मिळवणारी बॅडमिंटनपटू सायना नेहवाल यांनी शनिवारी अमनोरा पार्क येथील छत्रभुज नरसी स्कूलमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेचे अध्यक्ष सुजय जयराज यांनी या ‘फायरसाइड कन्व्हर्सेशन’चे सूत्रसंचालन केले. आपल्या क्रीडा प्रवासातील अनुभव सांगताना सायना नेहवाल यांनी शिस्त, जिद्द आणि सातत्यपूर्ण मेहनतीचे महत्त्व अधोरेखित केले. यशाच्या मार्गावर अपयश अपरिहार्य असले, तरी त्यातून शिकत पुन्हा प्रयत्न करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. तणावाचा सामना करणे, आत्मविश्वास निर्माण करणे आणि ध्येयावर लक्ष केंद्रित ठेवणे याबाबतही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या सत्रात विद्यार्थी आणि पालकांनी सायना यांना विविध प्रश्न विचारले. स्पर्धेतील दबाव, पराभवानंतरची मानसिकता आणि कामगिरीतील सातत्य यासंबंधीच्या प्रश्नांना त्यांनी वैयक्तिक अनुभवांच्या आधारे उत्तरे दिली. यश मिळाल्यानंतरही नम्र राहणे आणि शिकण्याची वृत्ती कायम ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संवाद सत्रानंतर सायना नेहवाल यांनी शाळेच्या परिसरातील विद्यार्थ्यांची भेट घेतली. बॅडमिंटन कोर्टवर त्यांनी युवा खेळाडूंशी संवाद साधत आव्हानांकडे सकारात्मकतेने पाहण्याचा संदेश दिला.त्यांनी विद्यार्थ्यांना आव्हानांना उत्सुकतेने सामोरे जाण्याचा, आपल्या ध्येयासाठी शिस्तबद्ध राहण्याचा आणि क्रीडा, शिक्षण किंवा जीवनात कोणतेही अर्थपूर्ण यश हे झटपट मिळत नसून सातत्यपूर्ण प्रयत्नांमधूनच घडते, याची जाणीव करून दिली. यावेळी सुजय जयराज म्हणाले, “मोठे यश हे केवळ अंतिम निकालातून दिसते; मात्र त्यामागे असंख्य दिवसांची मेहनत, चिकाटी आणि सातत्याने शिकण्याची प्रक्रिया असते.” या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *