![]()
पुणे शहरात दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. पुणे-सोलापूर रस्ता आणि उंड्री परिसरात शुक्रवारी (२४ जुलै) या घटना घडल्या. पहिला अपघात पुणे-सोलापूर रस्त्यावरील कुंजीरवाडी परिसरात पहाटे चारच्या सुमारास झाला. येथे एका भरधाव टेम्पोने ट्रकला पाठीमागून धडक दिली. त्यानंतर, पाठीमागून येणाऱ्या एका जीपनेही ट्रकला धडक दिली. या अपघातात टेम्पो चालक नल्लाबेल्ली नागेश्वरराव (वय ५०, रा. पुडी, विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश) यांचा मृत्यू झाला. ट्रक चालक मोहम्मद हनीफ ख्वाजामियाँ शेख (वय ३८, रा. बार्शी, जि. सोलापूर) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात याप्रकरणी फिर्याद दिली आहे. गंभीर जखमी झालेल्या नल्लाबेल्ली यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक योगेश पैठणे या प्रकरणाचा तपास करत आहेत. दुसरा अपघात कात्रज-मंतरवाडी बाह्यवळण मार्गावर उंड्री परिसरात सकाळी नऊच्या सुमारास घडला. भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने रुपेश दिलीप बनसोडे (वय ३१, रा. वारजे माळवाडी) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी डंपर चालक साईराज संभाजी शितोळे (वय २५, रा. भूमकर चौक, वाकड) याला अटक करण्यात आली आहे. मृत रुपेश यांचा भाऊ योगेश (वय ३३) यांनी काळेपडळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक अमित शेटे या अपघाताचा पुढील तपास करत आहेत. पादचारी महिलांचे दागिने हिसकावले पादचारी महिलांकडील ७५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हिसकावून नेल्याची घटना वानवडीतील एबीसी फार्म रस्त्यावर घडली. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका महिलेने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला आणि त्यांची मैत्रीण शुक्रवारी (२४ जुलै) रात्री आठच्या सुमारास वानवडीतील एबीसी फार्म रस्त्याने निघाली होती. त्या वेळी ऑक्सफोर्ड सोसायटीसमोर महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी, तसेच मैत्रिणीच्या गळ्यातील मंगळसूत्र असा ७५ हजार रुपयांचा ऐवज दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेला.
Source link
पुणे शहरात दोन अपघातांत दोघांचा मृत्यू:पुणे-सोलापूर रस्ता आणि उंड्री परिसरातील घटना, पोलिसांकडून तपास सुरू